
पावसाळ्यात डासांच्या उपद्रवामुळे होणारे डेंग्यू, मलेरिया, झिका, चिकनगुनियासारखे आजार रोखण्यासाठी या वर्षीपासून पालिका ‘मुव्ही ट्रप’ हा अभिवन उपक्रम राबवणार आहे. ‘मुव्ही ट्रप’ या सापळ्यामध्ये यंत्राच्या ठेवण्यात आलेल्या पाण्याकडे अंडी घालणारी मादी आकृष्ट होऊन त्यातील पाण्यात अंडी घालणार आहे. मात्र पाण्यातील वैशिष्टय़पूर्ण कीटकनाशकांमुळे ही अंडी ताबडतोब नष्ट होणार आहेत. त्यामुळे कीटकांच्या निर्मितीच्या मुळावरच घाव घातला जाणार आहे.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कीटकनाशक धूम्रफवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, जनजागृती करणे आदी उपाययोजना करण्यात येतात. तरीदेखील पावसाळी आजार रोखणे आव्हान ठरते. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीलाच आळा घालणाऱया ‘मुव्ही ट्रप’ उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी सांगितले. हा उपक्रम पर्यावरणपूरक घरामध्ये वापरता येणार असल्याचे पालिकेच्या व्यवसाय विकास कक्षाच्या डॉ. शशी बाला यांनी सांगितले. याप्रसंगी ‘पद्मश्री’ शास्त्रज्ञ प्रा. ए.पी. दाश, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, प्राध्यापक सुशांता कुमार घोष, दिल्ली स्थित आय. सीडीएचआय संस्थेचे सल्लागार डॉ. रजनी कांत, नायरच्या डॉ. प्रिव्हेंटिव्ह व सोशल मेडिसीन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रुजुता हाडये, पालिकेचे कीटकनाशक अधिकारी रितेश मरापे, संस्थेचे प्रसाद फडके आदी उपस्थित होते.

























































