मोदींनी आपल्या संबोधनात महिलांचा कमी पण काँग्रेसचा 59 वेळा उल्लेख केला, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर टीका करत ते पूर्णपणे राजकीय असल्याचा आरोप केला आहे. संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर शनिवारी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. मात्र, या भाषणात देशाच्या प्रश्नांऐवजी विरोधकांवर टीका आणि चिखलफेक करण्यात आली, असा दावा खरगे यांनी केला.

खरगे यांनी ‘X’वर पोस्ट करत म्हटले की, गेल्या 12 वर्षांत दाखवण्यासारखे काहीच नसल्यामुळे पंतप्रधान मोदी निराश आणि हताश झाले असून त्यांनी अधिकृत भाषणालाच राजकीय रंग दिला. या भाषणात सरळसरळ खोटेपणा आणि विरोधकांवर हल्ला करण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले. आगामी दोन मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना पंतप्रधानांनी अधिकृत यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले, असा आरोप करत त्यांनी याला लोकशाही आणि संविधानाचा अपमान असल्याचे म्हटले.

पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करताना खरगे यांनी म्हटले की, मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसचा तब्बल 59 वेळा उल्लेख केला, तर महिलांचा क्वचितच उल्लेख केला. यावरून त्यांच्या प्राधान्यक्रमाचा अंदाज येतो, असे ते म्हणाले. “महिला भाजपच्या प्राधान्यक्रमात नाहीत, काँग्रेस आहे,” असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने नेहमीच महिला आरक्षणाला पाठिंबा दिला असून 2010 मध्ये राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात पक्षाची महत्त्वाची भूमिका होती आणि 2023 च्या कायद्यालाही काँग्रेसने पाठिंबा दिला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वतःच्या विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपला तीन वर्षे लागली, यावरून ‘नारी शक्ती’बाबत त्यांची बांधिलकी दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.

खरगे यांनी पंतप्रधानांसमोर तीन मागण्या देखील मांडल्या. विद्यमान 543 लोकसभा जागांमध्येच महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करावे, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक एकत्र करू नये आणि 140 कोटी भारतीयांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या एक्स पोस्टमधून केली आहे.

भाजपवर महिलांविरोधात भूमिका असल्याचा आरोप करत त्यांनी हाथरस, उन्नाव आणि हरियाणातील महिला कुस्तीपटूंच्या प्रकरणांचा उल्लेख केला. तसेच, बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींना दिलेल्या सुटकेचा संदर्भ देत, “गुन्हेगार आणि बलात्काऱ्यांचा सन्मान करण्यात आला,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.