
दोन तृतीयांश बहुमताअभावी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यामुळे मोदी सरकार तोंडावर आपटले आहे. या पराभवामुळे निराश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री साडे आठ वाजता लाईव्ह येत विरोधकांवर आगपाखड केली. मोदींचे हेच भाषण आता वादात सापडले आहे. मोदींनी आपल्या भाषणातून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील राज्यसभा खासदार पी. संदोष कुमार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्र लिहून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे भाषण पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे होते. यामध्ये पक्षपाती दावे, निवडक कथने होती. राजकीय वादाचे विषयांद्वार जनमतावर प्रभाव टाकण्याचे थेट प्रयत्न करण्यात आले आहेत, असा आरोप खासदार पी. संदोष कुमार यांनी केला. तसेच मोदींचे हे भाषण दूरदर्शन आणि संसद टीव्ही यांसारख्या सार्वजनिक प्रसारमाध्यमांवरून प्रसारित करण्यात आले. सरकारी संसाधने आणि सार्वजनिक निधीवर चालणाऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर राजकीय भाषणासाठी करणे हा निवडणूक नियमांचा गंभीर भंग असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
P Sandosh Kumar, CPI Rajya Sabha MP from Keralam has written a letter to Gyanesh Kumar, Chief Election Commissioner, for violation of the Model Code of Conduct through the PM’s address.
“The recent address to the nation by the Prime Minister and BJP leader Narendra Modi was, by… pic.twitter.com/mwCMwLUwZm
— ANI (@ANI) April 19, 2026
आचारसंहितेच्या काळात सर्व पक्षांना समान संधी मिळणे आवश्यक असते. मात्र, सरकारी यंत्रणेचा असा वापर निवडणूक आयोगाच्या घटनात्मक जबाबदारीला बाधा आणणारा आहे, असा दावा पी. संदोष कुमार यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि जनतेचा विश्वास उडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी आणि निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार की नेहमीप्रमाणे बोटचेपी भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, महिला मतदारांना भडकवले; काँग्रेस नेते अशोक गहलोत यांचा आरोप
























































