कानपुर हादरलं… जुळ्या मुलींचे गळे चिरले आणि नंतर पोलिसांना बोलावले, जन्मदाता बाप मुलींच्या जीवावर उठला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

कानपूरच्या नौबस्तामध्ये रविवारी पहाटे दोन जुळ्या मुलींचे गळे चिरून हत्या केली गेली. रविवारी पहाटे (19 एप्रिल) ही घटना घडली असून, ११ वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या करण्यात आलेली आहे. वडिलांनी त्यांच्या फ्लॅटमध्येच मुलींचे गळे चिरले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. आरोपी वडिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेची माहिती देताना, डीसीपी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, “शशी रंजन मिश्रा, एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असून, नौबस्ता पोलीस ठाण्यांतर्गत किडवाई नगर येथील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या पश्चात पत्नी रेश्मा छेत्री आणि तीन मुले आहेत. ११ वर्षांच्या जुळ्या मुली रिद्धी आणि सिद्धी, आणि ६ वर्षांचा मुलगा गन्नू. रविवारी पहाटे ४:३० वाजता ११२ नंबरवर या हत्येची माहिती मिळाली.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस फ्लॅटवर पोहोचले तेव्हा दोन्ही मुलींचे मृतदेह जमिनीवर एकमेकांच्या शेजारी पडलेले होते. संपूर्ण खोलीत रक्त पसरले होते. त्यांचे गळे चिरलेले होते आणि जवळच एक चाकू पडलेला होता. आरोपी वडीलही मृतदेहांजवळ बसले होते. त्याला घटनास्थळीच अटक करण्यात आली. या हत्येचे कारण अद्याप उघड झालेले नाही.”

पत्नी म्हणाली, “२०१४ मध्ये त्यांचं प्रेमविवाह झाला होता. नवरा दारूच्या नशेत तिला रोज मारहाण करायचा. घरात प्रवेशद्वारापासून ते स्वयंपाकघर आणि बेडरूमपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तो मला खोलीत जाऊ देत नसे. तो दोन्ही मुलींसोबत त्याच्या खोलीतच राहायचा. मी बाहेरून स्क्रीनवर त्याच्या खोलीचे फुटेज बघायचे. तो अनेकदा म्हणायचा, ‘तू तुझ्या मुलासोबत कुठेतरी निघून जा, मी मुलींना सांभाळेन.'”

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि अधिक तपास सुरू केला आहे.