
दरवर्षी सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाला. रविवारी श्री यमुनोत्री धाम आणि श्री गंगोत्री धामचे यांचे दरवाजे मुहूर्ताच्या क्षणी उघडल्यानंतर, भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला. यात्रेदरम्यान प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. प्रार्थना आणि विधींनंतर, देवी गंगेची पालखी मुखबा गावातील तिच्या हिवाळी निवासस्थानाहून निघाली. या पालखीसोबत स्थानिक आणि यात्रेकरू दोघांमधील उत्साह वाखाणण्याजोगा होता. देवी गंगेची पालखी निघाल्यानंतर, देवी यमुनेची पालखीदेखील खरसली गावातील तिच्या हिवाळी निवासस्थानाहून निघाली. यानंतर या दोन्ही मूळ मुर्त्यांची मंदिरात स्थापना झाली.
ढोल-डमरू आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ‘जय मा गंगा’च्या जयघोषाने गाव दुमदुमून गेले. मोठ्या संख्येने भक्त, पुजारी, साधू आणि अधिकारी या मिरवणुकीत सामील झाले होते. यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिर संकुलात पालखीतील मूर्तींची स्थापना केली.
चारधाम यात्रेमध्ये केदारनाथची यात्रा २२ एप्रिल रोजी, तर त्यानंतर श्री बद्रीनाथ धाम २३ एप्रिल रोजी सुरू होईल. शनिवार संध्याकाळपर्यंत, यात्रेसाठी १८.९ लाख भाविकांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. केदारनाथमध्ये सर्वाधिक ६.५ लाख नोंदणी झाली, त्याखालोखाल बद्रीनाथ (५.५ लाख), गंगोत्री (३.३ लाख) आणि यमुनोत्री (३.२ लाख) यांचा क्रमांक लागतो.
शनिवारी रात्री या यात्रेसाठी मुख्यमंत्री धामी यांनी ऋषिकेशमधील चार धाम यात्रा संक्रमण शिबिरातून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. चारधाम यात्रा पारंपरिकरित्या हरिद्वार किंवा ऋषिकेश येथून प्रामुख्याने सुरू होते. यमुनोत्री, गंगोत्री व केदारनाथ मार्गे प्रवास करत अखेरीस बद्रीनाथ येथे पोहोचते. ही यात्रा दरवर्षी भारत आणि परदेशातून हजारो भाविकांना आकर्षित करते.























































