
संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत विरोधी पक्षांवर टीका केली होती. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. पुढच्या वेळी संसदेत उभं राहून बोला, जिथे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात असे आव्हान बॅनर्जी यांनी दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “प्रामाणिकपणे हा मुद्दा हाताळण्याऐवजी देशाला गोंधळात टाकण्याचा मार्ग निवडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.” तृणमूल काँग्रेस कधीही महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हती आणि भविष्यातही राहणार नाही. उलट, महिलांना अधिक राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्न करत आला आहे.
संसद आणि राज्य विधानसभांमध्ये तृणमूल काँग्रेसकडून निवडून आलेल्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेत पक्षाचे 37.9 टक्के सदस्य महिला आहेत, तर राज्यसभेत 46 टक्के महिलांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे त्यांनी नमूद केले.
खरा वाद हा महिला आरक्षणाचा नसून मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेचा आहे. “मोदी सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी महिलांना ढाल बनवून मतदारसंघ पुनर्रचना पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, ही केवळ निवडणूक रणनीती नसून देशाच्या संघराज्य रचनेवर परिणाम करणारी मोठी राजकीय योजना आहे.
ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेचे दूरगामी परिणाम स्पष्ट करताना म्हटले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात फेरबदल करून, देशाची एकता धोक्यात घालणे आणि राजकीय सीमांमध्ये बदल करून भाजप शासित राज्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू आहे.” त्यांनी या प्रकाराला “gerrymandering” म्हणजेच राजकीय नकाशे बदलून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असे संबोधले. “हा संघराज्य लोकशाहीवर थेट हल्ला आहे आणि आम्ही तो कधीही शांतपणे पाहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
महिला आरक्षण विधेयक 28 सप्टेंबर 2023 रोजी मंजूर झाल्यानंतरही जवळपास तीन वर्षे त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “जर सरकार खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असते, तर इतका विलंब का झाला? आणि आता निवडणुका सुरू असताना हे अचानक पुढे का आणले जात आहे? तसेच महिला आरक्षणाला मतदारसंघ पुनर्रचनेशी का जोडले जात आहे?” असे प्रश्न त्यांनी विचारले.
तृणमूल काँग्रेसने अनेक दशकांपासून महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने काम केले असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. “महिलांच्या प्रश्नांवर आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार त्यांना नाही, कारण या विषयाचे ना त्यांना ज्ञान आहे, ना संवेदनशीलता,” असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधानांना उद्देशून त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका करत म्हटले की, “पुढील वेळी राष्ट्राला संबोधित करताना संसदेत उभे राहून बोला, जिथे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, आव्हान दिले जाऊ शकते आणि जबाबदारी निश्चित होते. कालचे तुमचे भाषण भ्याड, ढोंगी आणि दुटप्पी होते.” तसेच, “सत्ता हातातून निसटत असल्याची जाणीव तुम्हाला झाली आहे आणि ती टिकवण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाण्यास तयार आहात,” असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
It is deeply unfortunate that the Prime Minister chose to mislead the nation rather than address it honestly.
Let me put this on record. Trinamool Congress has always championed higher political representation for women. We have the highest proportion of female elected…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) April 19, 2026
























































