
आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती आणि एलपीजी संकटाचा परिणाम हिंदुस्थानातील विविध भागांत जाणवू लागला असून, त्याचा मोठा फटका गुजरातमधील सूरत शहराला बसत आहे. उद्योगधंद्यांवर परिणाम होत असल्याने अनेक कंपन्या बंद पडू लागल्या आहेत, तर बाहेरील राज्यांतील कामगारांना आपल्या गावी परतण्याची वेळ आली आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर सूरतमधील उधना रेल्वे स्थानकावर रविवारी प्रचंड गर्दी उसळली. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो प्रवासी स्थानकावर जमले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, ज्यामुळे काही काळ भगदडीसारखी स्थिती निर्माण झाली.
शनिवार (18 एप्रिल 2026) सायंकाळपासूनच प्रवाशांची गर्दी वाढू लागली होती. स्थानकाबाहेर प्रवाशांच्या रांगा तब्बल 5 किलोमीटरपर्यंत पसरल्याचे चित्र दिसून आले. प्रचंड उष्णतेत लहान मुलांसह कुटुंबे 10 ते 12 तास प्रतीक्षा करत असल्याचे पाहायला मिळाले. दीर्घ प्रतीक्षा आणि उकाड्यामुळे एका प्रवाशाला बेशुद्ध पडल्याचीही घटना घडली.
गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. प्रवाशांची संख्या इतकी वाढली आहे की 100 लोकांच्या क्षमतेच्या डब्यात तब्बल 500 प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. अनेकांना जागा न मिळाल्याने जमिनीवर, दरवाज्याजवळ किंवा अगदी शौचालयाजवळ बसून प्रवास करावा लागत आहे.
More than 21,000 passengers have been transported to their destinations from Udhna through these trains today.
Additionally, one more special train is scheduled to depart from Udhna at 21:40 hrs today for Jaynagar.The on-ground situation at the station remains normal, orderly,… pic.twitter.com/P3qOLw5qwE
— Western Railway (@WesternRly) April 19, 2026
पश्चिम रेल्वेचे अधिकारी श्रवण कुमार मेघवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत चार विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर 1:30 ते रविवारी सकाळी 9 वाजेदरम्यान या गाड्या चालवण्यात आल्या. त्यापैकी दोन गाड्यांमधून 8000 हून अधिक प्रवासी पाठवण्यात आले, तर उर्वरित दोन गाड्यांमधून सुमारे 1200 प्रवासी रवाना झाले. वाढती गर्दी लक्षात घेऊन आणखी विशेष गाड्यांची व्यवस्था केली जात असून, ताप्ती गंगा एक्सप्रेसद्वारेही प्रवाशांना पाठवण्याची तयारी सुरू आहे.
सध्या उधना स्थानकावरील गर्दी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून, पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असली तरी, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हे आव्हान अधिक कठीण बनले आहे.

























































