
छत्तीगडमधील कोळसा घोटाळ्यातील आरोपी आणि निलंबित आयएएस अधिकारी समीर बिश्नोई यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बिश्नोई यांच्यावर कारवाई करत त्यांची सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. समीर बिश्नोई यांच्यावरील आरोपांची गांभीर्याने दखल घेत रायपूरच्या विशेष न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जुलै 2024 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने बिश्नोई यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर तपासादरम्यान, गुन्हे शाखेला बिश्नोई यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या नावावर असलेल्या एकूण नऊ मालमत्तांची माहिती मिळाली. या मालमत्तेची किंमत सुमारे 4 कोटी रुपये इतकी आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता ही सर्व मालमत्ता जप्त केली असून ही मालमत्ता विकण्यास आणि हस्तांतरीत करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कोळसा घोटाळ्याशी संबंधित बिश्नोई यांच्या पाच मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केल्या आहेत.
2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी समीर बिश्नोई यांना ईडीने पहिल्यांदा 2022 मध्ये कोळसा घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. बिश्नोई यांनी जुलै 2020 ते जून 2022 दरम्यान 540 कोटी रुपयांची अवैध कर वसुली केल्याची माहिती आहे. यामध्ये कोळसा वाहतुकीसाठी प्रति टन 25 रुपयांचा अवैध कर वसूल करण्यासाठी नोकरदार, व्यापारी आणि राजकारणी यांचा वापर करण्यात आला होता. बिश्नोई यांना गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

























































