
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळील नव्या पुलावर आज रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून थेट १५ फूट खाली विहिरीत कोसळून अपघात घडला. या अपघातात ट्रक चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
ट्रक (एमएच ०६ बीडी २५५५) लोखंडी साहित्य घेऊन पालीहून रत्नागिरीकडे जात होता. पहाटे सुमारे ४ वा.४५ मि.वाजण्याच्या सुमारास हातखंबा येथील पुलावर आल्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव ट्रकने प्रथम समोरील आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे ९९१३) ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेने आंब्याच्या पेट्या घेऊन वेंगुर्लाहून वाशीला निघालेला टेम्पो पलटी झाला. यानंतर पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या आयशर टेम्पोला (एमएच ०५ ईएल ०२२७) धडकला. दरम्यान, अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या इर्टिगा
कार (एमएच ४६ सीआर ९१२३) ला देखील उजव्या बाजूने धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की अपघातग्रस्त ट्रक थेट पुलाच्या खाली सुमारे १५ फूट खोल विहिरीत कोसळला.
या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू होते. ट्रकमधील क्लीनर योगेश गौतम माळी (वय ३२, रा. धाराशिव) तसेच महामार्गावरील कामगार राजू कुमार (वय १९, रा. उत्तर प्रदेश) हेही जखमी झाले आहेत. आयशर टेम्पो चालक इकबाल याकूब खान (वय ४२, रा. झाराप, सिंधुदुर्ग) आणि ईरटीका चालक विशाल विजय पाटील (वय ३८, रा. रायगड) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तत्काळ जगतगुरु नरेंद्र महाराज ॲम्बुलन्सच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस तात्काळ दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर अपघातातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.ट्रकचा चालक गाडीत अडकून पडला होता.त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.



























































