Ajmer accident – प्रवाशांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली; 2 जणांचा मृत्यू, 31 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या अजमेर येथे भीषण अपघात झाला आहे. पुष्करकडे जाणारी बस खोल दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

33 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुष्कर घाटामध्ये अनियंत्रित झाली आणि खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने ही बस झाडाझुडपांमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र या भीषण अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्व प्रवासी अजमेरहून पुष्करच्या दिशेने एका गावातील सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होते.

दरम्यान, अनियंत्रित झालेली बस सांझीसरच्या थोडे पुढे मुख्य रस्त्यावरून खाली दरीत कोसळली अशी माहिती सर्कल ऑफिसर रामचंद्र चौधरी यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कपड्यांपासून दोर बनवत जमखींना दरीतून बाहेर काढले. त्यानंतर एसडीआरएफ, नागरी संरक्षण दल आणि स्थानिक पोलिसांनी बचाव मोहीम राबवली

सर्व जखमींना सुरुवातीला पुष्करमधील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर अजमेरच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या 30 रुग्णांवर उपचार सुरू असून एकाला उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आल्याचे रुग्णालय अधीक्षक डॉ. अरविंद खरे यांनी सांगितले. तर या अपघातात पूजा (वय – 28) आणि विमला देवी (वय – 50) या दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या अपघातामुळे पुष्कर घाट परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.