IPL 2026 – चेन्नईवरील थरारक विजय हैदराबादसाठी टर्निंग पॉईंट ठरणार; दिग्गज खेळाडूचं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या लढतीत हैदराबादने चेन्नईचा 10 धावांनी पराभव केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डेल स्टेन याने मोठे विधान केले. चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय हैदारबादसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे स्टेन स्टार स्पोर्टवर बोलताना म्हणाला. ‘पीटीआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

ईशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादची यंदाच्या हंगामात खराब सुरुवात झाली होती. त्यानंतर हैदराबादने लय पकडली आणि तीन सामने जिंकत गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर झेप घेतली. रविवारी चेन्नईविरुद्धचा सामना हैदराबाद गमावतो की काय अशी स्थिती होती. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत चेन्नईला रोखले. चेन्नईविरुद्धचा हा विजय हैदराबादचा संघ आता लयीत परतल्याचे संकेत असल्याचे स्टेन म्हणाला.

हा सामना सुरू असताना डावाच्या मध्यावर मी हेनरिक क्लासेन याच्याशी बोलत होतो. हैदराबादने 10 ते 15 धावा कमी केल्या असे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. विजयासाठी गोलंदाजांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील असेही तो म्हणाला होता आणि हैदराबादच्या गोलंदाजांनी ते करून दाखवले, असेही स्टेन म्हणाला.

हैदराबादच्या क्षेत्ररक्षणातही चपळता आणि जिद्द दिसत होती. हैदराबादने काही कठीण झेलही घेतले आणि विजय मिळवला. तेव्हा मी क्लासेनकडे बघितले. त्याने प्रेक्षकांकडे वळून आपल्या छातीवर हात मारला आणि एसआरएचच्या बॅजकडे इशारा केला. आमची पाठराखण केल्याबद्दल धन्यवाद, असेच तो प्रेक्षकांना म्हणत होता, असेही स्टेनने म्हटले.

IPL 2026 – हैदराबादचा ‘यलो आर्मी’ला दे धक्का; शेवटच्या षटकात चेन्नईवर थरारक विजय

यावेळी स्टेनने सामन्यात तीन विकेट्स घेणाऱ्या मलिंगाच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. चेन्नईला मोठ्या फटक्यांची गरज होती तेव्हा मलिंगाने अचूक यॉर्कर टाकले. त्याने ऋतुराज गायकवाडला बाद केले तो बाऊन्सही अप्रतिम होता. श्रीलंकेच्या या तरुण गोलंदाजांनी अचूक टप्पा पकडला होता, असेही स्टेन म्हणाला. तसेच क्लासेनच्या फटकेबाजीचेही त्याने कौतुक करत म्हटले की, त्याच्याकडे सहज षटकार मारण्याची आणि स्ट्राईक रेट वाढण्याची क्षमता आहे. संघ अडचणीत येतो तेव्हा तो एकटा खिंड लढवून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देतो, असेही तो म्हणाला.