पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर ट्रम्प प्रशासनासाठी धोक्याची घंटा, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालाने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावत आहे. दोन्ही उभय देशांमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शांतता चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी इस्लामाबाद येथे होण्याची शक्यता असतानाच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने एक खळबळजनक अहवाल दिला आहे. मुनीर यांचे इराणच्या लष्करी नेतृत्वाशी असलेले घनिष्ठ संबंध ट्रम्प प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल असीम मुनीर यांचा उल्लेख माझे आवडते फील्ड मार्शल असा केला होता. त्यानंतरही अमेरिकेची गुप्तचर संस्था मुनीर यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. मुनीर यांची इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्ससोबतची त्यांची जुनी मैत्री अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकते, असे ‘फॉक्स न्यूज’च्या अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानचे निवृत्त जनरल अहमद सईद यांनी फॉक्स न्यूज डिजिटलला दिलेल्या माहितीनुसार, असीम मुनीर 2016-17 मध्ये पाकिस्तान मिलिट्री इंटेलिजन्सचे महासंचालक होते. तेव्हापासूनच त्यांनी इराणसोबत संबंध दृढ करण्यास सुरुवात केली होती. मुनीर यांचे इराणच्या लष्कराव्यतिरिक्त IRGC सोबतही जवळचे संबंध आहेत. एवढेच नाही तर कुद्स फोर्सचे माजी कमांडर कासिम सुलेमानी आणि सध्याचे कमांडर हुसैन सलामी यांच्याशीही त्यांचे साटेलोटे असल्याचे सईद यांनी सांगितले.

मित्र असल्याचे भासवून तालिबानला मदत

फाऊंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीजचे वरिष्ठ फेलो बिल रोगियो यांनी ट्रम्प प्रशासनाला सावधगिरीचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तान युद्धात पाकिस्तानने मित्र असल्याचे भासवून तालिबानला मदत केली होती. हा इतिहास विसरता कामा नये. मुनीर यांचे IRGC शी असलेले संबंध पाहता ट्रम्प यांनी पाकिस्तानवर डोळे झाकून विश्वास ठेवणे धोक्याचे ठरेल, असे रोगियो यांनी म्हटले आहे.

‘जर त्यांनी थोडीही चूक केली, तर…’, वाटाघाटीआधी इराण सतर्क; अमेरिकेला दिला कडक शब्दात इशारा