भुताटकी झाली बया भुताटकी झाली; नागोठण्याची स्वागत कमान रात्रीत गायब केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागोठणे शहराच्या वेशीवर असलेली सिमेंट काँक्रीटची भव्य स्वागत कमान एका रात्रीत गायब झाल्याची घटना घडली आहे. या ‘भुताटकी’चा व्हिडीओ व्हायरल होताच नागोठणेकरांना धक्काच बसला आहे. ही कमान तोडण्यासाठी नेमकी कुणी सुपारी दिली? कुणाला या कमानीचा अडथळा येत होता? असा सवाल विचारला जात असून जनतेच्या पैशातून उभ्या राहिलेल्या कमानीवर काळोखात बुलडोझर चालवणाऱ्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, इतकी मोठी घटना होऊनही ग्रामविकास अधिकारी गप्प का? त्यांनी पोलिसात तक्रार का नोंदवली नाही? असा सवालही विचारला जात आहे.

नागोठणे शहरात ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटच्या तीन स्वागत कमानी उभारल्या होत्या. यावर ठळक अक्षरात ‘नागोठणे शहरात आपले स्वागत आहे’ असा उल्लेख आहे. यातील सरकारी दवाखान्याजवळील एक कमान रस्ता रुंदीकरणात बाधित होत असल्याने यापूर्वी तोडली आहे. त्यामुळे नागोठणे एसटी स्थानकाजवळ एक, तर दुसरी कमान मुंबई-गोवा महामार्गावरून रिलायन्स कंपनीच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर होती. मात्र ही कमान काही समाजकंटकांनी बुलडोझर लावून एका रात्रीत तोडून टाकली आहे. या कमानीचा मलबा रस्त्याच्या बाजूलाच टाकून देण्यात आला आहे. मात्र इतकी मोठी स्वागत कमान तोडूनही ग्रामपंचायत ढिम्म असल्याने हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सुपारी कोणी दिली? वेलशेत-आंबेघर भागात

नागोठणे परिसरातील रिलायन्सचा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे सध्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून रोजच मोठमोठ्या ट्रक व ट्रेलरमधून मशिनरी तसेच महत्त्वाची अन्य मार्गावरून येत असते. आता ही कमानच गायब केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमके कोणाच्या फायद्यासाठी ही सुपारी घेऊन कमानीवर बुलडोझर चालवण्यात आला, असा प्रश्न भाजपचे रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे यांनी केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीची संपत्ती असलेली ही कमान गायब झाल्यानंतर प्रशासन शांत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नागोठणे पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह

नागोठणे पोलीस डोळ्यात तेल टाकून रात्रभर परिसरात पेट्रोलिंग करतात. मात्र महामार्गावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली सिमेंट काँक्रीटची भलीमोठी कमान एका रात्रीत तोडली जात असताना त्याकडे पोलिसांचे लक्षच न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन या गंभीर घटनेची दखल घेऊन समाजकंटकांचा शोध लावतील का, असा सवाल नागोठणेकरांनी केला आहे.