
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ कंटेनर आणि दुचाकीमध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चिरडले असून या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. या दाम्पत्याचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
कल्पेश रेवाळे (30) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी रेवाळे (31) हे दोघेजण एका खासगी बँकेत कामाला होते. कल्पेश हा एचडीएफसी बँकेच्या अंधेरी शाखेत, तर त्यांची पत्नी मीनाक्षी या अॅक्सीस बँकेच्या कलिना शाखेत नोकरी करत होत्या. मीनाक्षी यांची आई डोंबिवली परिसरात राहत असून ती आजारी आहे. हे दोघे त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी डोंबिवलीत दुचाकीने गेले होते. आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्या दिवशी त्यांनी तिथे मुक्काम केला. शनिवारी सकाळी ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी नाशिक ते मुंबई महामार्गावर खारेगावजवळ आले असता एका भरधाव कंटेनरने त्यांना चिरडले.
कंटेनरचालक पोलिसांच्या ताब्यात
अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरचालक शिवकुमार सिंग याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई-नाशिक मार्गावर भरधाव गाडी चालवणाऱ्या अवजड वाहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.


























































