इराण आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत, होर्मुझ सामुद्रधुनीत गोळीबारप्रकरणी इराणची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
iran-vs-us-navy-tension-at-hormuz-trump-threat-worsens-global-oil-route

होर्मुझ सामुद्रधुनीत हिंदुस्थानचा ध्वज असलेल्या जहाजांवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने रविवारी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्थानातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी दोन्ही देशांतील मजबूत संबंध अधोरेखित करत शांततेचे आवाहन केले.

डॉ. इलाही म्हणाले की, “इराण आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत आहेत. आपण उल्लेख केलेल्या घटनेबाबत मला ठोस माहिती नाही, मात्र ही परिस्थिती लवकरच सुरळीत होईल अशी आम्ही आशा करतो.” त्यांनी पुढे स्पष्ट केले, “आम्हाला युद्ध नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे आणि दुसऱ्या बाजूनेही त्याच दिशेने पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.”

दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना ‘Sanmar Herald’ आणि ‘Jag Arnav’ या हिंदुस्थानचा ध्वज असलेल्या दोन जहाजांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या जहाजांवर सुमारे दोन कोटी बॅरल इराकी कच्चे तेल होते. गोळीबारानंतर दोन्ही जहाजांना प्रवास अर्धवट सोडून मागे फिरावे लागले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

या घटनेनंतर हिंदुस्थानने तीव्र निषेध नोंदवत इराणकडे सुरक्षित जलवाहतुकीची हमी देण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इराणचे दूत मोहम्मद फथाली यांना बोलावून याबाबत स्पष्टीकरण मागितले.

अहवालांनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर ग्रीक टँकर्ससह अनेक जहाजांनीही आपला मार्ग बदलत मागे फिरण्याचा निर्णय घेतला. इराणने अमेरिकेच्या नाकेबंदीचा हवाला देत होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, ही घोषणा सामुद्रधुनी खुली असल्याचे सांगितल्यानंतर अवघ्या 24 तासांत करण्यात आली.