
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल ठरले आहेत. त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला. खरात फाईल्स, नराधम एरंडे, टीसीएसमधील छळवणूक प्रकरण याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
संजय राऊत म्हणाले की, आपण धर्मांतर विरोधी कायदा आणला असून सत्य बाहेर आले पाहिजे. सरकारकडे योग्य कारवाईची माहिती असती तर खरात फाईल्स प्रकरणातील अनेक मंत्र्यांवर एव्हाना कारवाई झाली असती. खरात प्रकरणात अनेक हिंदू महिलांचे शोषण झाले. तिथे खरात ऐवजी कुणी सलीम, अब्दुल असता तर आतापर्यंत वादळ पेटले असते, त्याच्या आश्रमावर बुलढोझर फिरला असता. खरात, नाशिकचा एरंडे हे काही मुस्लिम नाहीत. पण तुम्ही त्यांना संरक्षण देत आहात. ते तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचे आणि भाजपचे प्रचारक आहेत.
टीसीएसमधील एका प्रकरणामुळे देशावर संकट कोसळल्यासारखे आणि देशाचे इस्लामीकरण झाल्यासारखे वागत आहेत. या देशात 80 कोटींहून अधिक हिंदू आहेत. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि तिन्ही सेनाप्रमुख हिंदू आहेत. देशाची सगळी सूत्र हिंदुंकडे आहेत. त्यामुळे हिंदू खतऱ्यात कशाकरता येईल? आणि आलाच तर आम्ही आहोत, तुम्ही कशाला नाटकं करता? असा टोला राऊत यांनी लगावला.
हिंदू खतऱ्यात कधी येतो, कधी नाही हे आम्हाला चांगले माहिती आहे. 1992 ला हिंदू खतऱ्यात आला तेव्हा भाजपवाले शेपट्या घालून आत बसले होते. तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आमच्या 72 लोकांनी बलिदान दिले होते, असेही राऊत यावेळी म्हणाले.
बॉलीवूडमधील खान लोकांमुळे लव्ह जिहाद वाढल्याचे विधान मंत्री नितेश राणे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना सांगा. खानांची खानावर त्यांनीच आपल्या स्वार्थासाठी चालवली आहे. या देशामध्ये हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपण इतिहास पाहिला तर दिलीप कुमार, मिना कुमारी, मधुबाला, महबूब हे सगळे लोक मुस्लिम समाजातून आले. त्यांनी सिनेसृष्टी समृद्ध केली. शाहरूख खान, सलमान खान आताचे आहेत. ते तुमच्याच पक्षाबरोबर जास्त असतात. नारायण राणे यांच्या वाढदिवसाला कोकणात किती खान गेले होते? त्यामुळे जपून बोलले पाहिजे. आपण राज्याचे मंत्री आहात. संविधानाचा जरा अभ्यास करा, असा टोला राऊत यांनी लगावला.
























































