
माजी राजस्थान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्राला संबोधित करताना मोदी यांनी द्रविड मुनेत्र कळघम आणि तृणमूल काँग्रेसचा उल्लेख करून महिला मतदारांना भडकवण्याचा प्रयत्न केला, असे गहलोत यांनी म्हटले.
सध्या आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू असून काही राज्यांत पोटनिवडणुका देखील होत आहेत. या पार्श्वभूमीवर गहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना टीका केली.
गेहलोत म्हणाले की, “मी पंतप्रधानांचे भाषण ऐकले. त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. निवडणुका सुरू असताना डीएमके आणि टीएमसीचा उल्लेख करून महिला मतदारांना भडकवण्याचा प्रयत्न केला. जर पंतप्रधानच आचारसंहितेचे उल्लंघन करत असतील, तर लोकशाहीचे काय होईल?” असा सवाल गहलोत यांनी उपस्थित केला.
काल देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक अडविल्याबद्दल विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या भूमिकेमुळे महिलांच्या आकांक्षांचा “चुराडा” झाल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही पंतप्रधानांच्या भाषणावर टीका केली. त्यांनी दावा केला की, मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा किमान 150 वेळा उल्लेख केला. तसेच, 2023 मध्ये काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक मांडले तेव्हा भाजपने त्याला विरोध केला होता, असा आरोपही त्यांनी केला.























































