
अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर एका सँडविचवाल्याने हल्ला केल्याचा प्रकार के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या परिसरात घडला आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात केडीएमसीचे अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश कामराज हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे पथक के. व्ही. पेंढरकर कॉलेज परिसरातील खाऊ गल्लीत पोहोचले होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत असल्याने महापालिकेकडून नियमित कारवाई केली जाते. याच कारवाईदरम्यान चंद्रकांत कदम या सँडविच विक्रेत्याने पथकाला विरोध केला. हप्ते घेतल्यानंतरही कारवाई केली जाते, असा आरोप करत कदम याने संतापाच्या भरात केडीएमसीचे अधिकारी तथा पथक प्रमुख सुरेश
कामराज यांच्यावर बांबूने हल्ला केला. या हल्ल्यात कामराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी सँडविच विक्रेता चंद्रकांत कदम याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































