सरकारला आंदोलनांचा धसका, शिवाजी पार्कात मोर्चाआधीच आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुती सरकारने आंदोलनांचा धसका घेतला आहे. कोणतेही आंदोलन जाहीर झाले की तत्पूर्वीच आंदोलनाच्या नेत्यांना नोटिसा पाठवून ताब्यात घेतले जाते. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह आदिवासी विभाग आयुक्त व सचिवांच्या राजीनाम्यासाठी आज आदिवासी ‘जेनझीं’चा जनआक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार होता. परंतु पोलिसांनी तत्पूर्वीच अगदी रेल्वे स्थानकापर्यंत फिल्डिंग लावून विद्यार्थ्यांची धरपकड केली. सुमारे 150 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आदिवासी विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यानंतरही आदिवासी विकास विभागाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. आज शिवाजी पार्कवर जनआक्रोश मोर्चासाठी मागूनही परवानगी मिळाली नाही. त्यानंतरही मोर्चा काढायचाच, असा इशारा आदिवासी विद्यार्थ्यांनी दिला होता.

विद्यार्थ्यांच्या मोर्चाच्या इशाऱयानंतर पोलिसांनी शिवाजी पार्कवर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवाजी पार्कवर पोहोचण्याच्या मार्गावर असलेली रेल्वे स्थानके आणि बसस्टॉपवरही पोलीस तैनात होते. दादर रेल्वे स्थानकात साध्या वेषातील पोलीस नजर ठेवून होते. विविध ठिकाणांहून सुमारे 120 विद्यार्थी शिवाजी पार्कपर्यंत पोहोचू शकले. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी अत्यंत शांततेत शिवाजी पार्कच्या दिशेने आलेल्या या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सराईत गुंडांसारखे पकडून गाडीत कोंबून नेले.

चैत्यभूमीवर सायंकाळनंतर मेणबत्ती मोर्चासाठी आलेल्या 20-25 आदिवासी जेनझींसह स्टँडअप कॉमेडियन मासूम रिजवानीला शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडून नेलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिले सुरक्षेचे कारण

सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलक विद्यार्थ्याना ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिवाजी पार्कवरील मोर्चा आज होऊ शकला नाही. आदिवासी शाळांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करावी, आदिवासी आश्रमशाळांमधील सेंट्रल किचनची कंत्राट पद्धत रद्द करावी अशीही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.