
शिक्षकांच्या जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळणाऱया साहिल वाकोडे या विद्यार्थ्याला महिना लोटला तरी न्याय मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले. याच्या निषेधार्थ व साहिलला न्याय मिळायलाच पाहिजे, या मागणीसाठी आज चैत्यभूमी येथे शांततेत कँडल मार्चचा आवाज दिला होता. पण याचा आधीच धसका घेतलेल्या सरकारने पोलिसांच्या मदतीने हे कँडल मार्च होऊ दिले नाही. विद्यार्थ्यांना अक्षरशः फरफटत बसमध्ये कोंबून नेण्यात आले.
आज संध्याकाळी 6 वाजता चैत्याभूमी येथे साहिल वाकोडे याला न्याय मिळावा व जुलमी शिक्षकाला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी शांततेत कँडल मार्चचे आयोजन केले होते. त्यानुसार विद्यार्थी पाच वाजल्यापासून एकवटण्यास सुरुवात झाली होती. मात्र पोलिसांनी आधीच तेथे बंदोबस्त ठेवला होता. विद्यार्थी आलेले दिसले की पोलीस त्यांना बळाचा वापर करून बसमध्ये कोंबत होते. त्यांना दुसऱया ठिकाणी घेऊन जाण्यात आले. बसमधून अक्षरशः कोंबून नेत असताना बसमधील लाईट्सदेखील बंद ठेवून काळोख करण्यात आला होता. काही वेळानंतर ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


























































