
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलबाबतच्या आपल्या भूमिकेत अवघ्या 24 तासांत मोठा बदल केला आहे. एक दिवसापूर्वी ट्रम्प यांनी लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबवण्याचे कडक आदेश दिले होते. कालपर्यंत आक्रमक भूमिकेत असलेले ट्रम्प आज काहीसे मवाळ झाल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांनी आता सोशल मीडियावर इस्रायलचे तोंडभरून कौतुक केले आहे. इस्रायल हा अमेरिकेचा एक महान आणि सामर्थ्यवान मित्र असल्याचे सांगत, लोकांना तो आवडत असो वा नसो, पण इस्रायलला लढणे आणि जिंकणे चांगले माहित आहे, अशा शब्दांत त्यांनी इस्रायलच्या रणनीतीचे समर्थन केले आहे.
ट्रम्प यांनी हे कौतुक करण्याच्या काही काळ आधीच इस्रायलला अत्यंत कडक भाषेत तंबी दिली होती. लेबनॉनमधील वाढता संघर्ष पाहता, आता खूप झाले यापुढे कोणतेही हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांच्या या अनपेक्षित आक्रमक भूमिकेमुळे सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे सध्या इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान 10 दिवसांची शस्त्रसंधी (सीझफायर) लागू झाली आहे. हिजबुल्लाहने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे लेबनॉनचे मोठे नुकसान झाले असून हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ही शांतता तात्पुरती असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दक्षिण लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास तूर्तास नकार दिला असून, ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांचा धोका कायम असल्याने लष्करी उपस्थिती आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, ट्रम्प यांनी इराणसोबतच्या संभाव्य कराराचा लेबनॉनमधील परिस्थितीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरून (Strait of Hormuz) निर्माण झालेल्या तणावावर भाष्य करताना ते म्हणाले की, इराण आता या जलमार्गाचा शस्त्रासारखा वापर करू शकणार नाही. मात्र, जोपर्यंत इराणसोबतचा संपूर्ण करार अंतिम होत नाही, तोपर्यंत अमेरिकन नौदलाची नाकेबंदी कायम राहील. इराणने पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनीवर निर्बंध लादल्यामुळे या भागातील परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
इस्रायलकडून लेबनॉनमध्ये विध्वंस सुरूच; घरांमध्ये स्फोटके पेरून गावे उद्ध्वस्त केली

























































