
नाशिकपाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाले आहे. ‘कर्करोगासारखे गंभीर आजार एका मंत्राने बरे करतो, तंत्रमंत्राच्या साहाय्याने महिलांना मूल होण्याची खात्री देतो, घरातील संकटे चुटकीसरशी दूर करतो…’ अशा खोट्या दाव्यांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला आज पहाटे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर राजेंद्र बापू गडगे (रा. वडगावपान, ता. संगमनेर) याच्यासह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गडगे याच्यासह मधुकर शिंदे (रा. रहिमपूर, संगमनेर) यांना अटक केली आहे. डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे या तीन आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे व त्यांच्या पथकाने वडगावपान येथे धाड टाकत राजेंद्र गडगे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.
भोंदूबाबा गडगेचे वाढते प्रकार हे आता चांगलेच गाजत चाललेले आहेत. नाशिकपाठोपाठ आता संगमनेरमध्ये असा प्रकार घडत होता. मात्र, कोणीही सुरुवातीला पुढे येत नव्हते. या भोंदूबाबा राजेंद्र गडगेची अनेक कृत्ये लपली गेली होती. तो स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. राजेंद्र गडगे हा वडगावपान परिसरात ‘दत्तधाम सरकार’ नावाने मठ चालवत होता. कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्राने बरे करणे, महिलांना मूलप्राप्तीची खात्री देणे, कौटुंबिक आणि आर्थिक संकटे दूर करण्याचे आश्वासन देणे अशा बहाण्याने तो गरजू लोकांकडून ११ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळत होता. विज्ञानाने हात टेकलेल्या आजारांवर उपचार करण्याचा दावा करून अनेक रुग्णांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
गवंडी-बिगारी काम करणारागडगे बनला भोंदूबाबा
प्रारंभी भोंदूबाबा गडगे हा गवंडी-बिगारी काम करायचा. कालांतराने भोंदूबाबा बनून मठ स्थापन केला आणि पैसे उकळू लागला. या भोंदूबाबा गडगेकडे केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नव्हे, तर परराज्यांतील म्हणजेच गुजरात, मध्य प्रदेश यांसह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांतून लोक येत होते. यामध्ये महिलांचासुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
सोशल मीडियावर चित्रफिती
समाजमाध्यमांवर विविध खाती उघडून तो स्वतःच्या कथित चमत्कारांच्या चित्रफिती प्रसारित करत होता. या व्हिडीओंच्या माध्यमातून भक्तांना जाळ्यात ओढून मोठा पैसा उकळला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गडगेकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
स्वतःवर कारवाईची चाहूल लागताच, भोंदूबाबा गडगेने समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व पोलीस आपल्याकडून पैसे मागत असल्याचे आरोप केले होते. या व्हिडीओंमुळे परिसरात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला हिसका दाखवला. याप्रकरणी भोंदूबाबा राजेंद्र गडगे याच्यासह पाचजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने राजेंद्र गडगे व मधुकर शिंदे यांना २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.























































