परीक्षण – चुकवू नये असा वाचनानुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अक्षय मोटेगावकर

डॉ. दासू वैद्य अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत ते सुप्रसिद्ध गीतकार, बाल साहित्यिक आणि सामाजिक आशयाचा वसा दीप्तमान करत स्वत्व आणि सत्त्व कवितेतून मांडणारे कवी म्हणून. तसं पाहिलं तर लिखाणाच्याच अंगाने जाणाऱ्या या गोष्टी असल्या तरी एकाच वाटेवरची तीन वेगवेगळ्या वळणांवरची ही ठिकाणं. ‘वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे’ म्हणणारा हा गीतकार एक दिवस अचानक ‘पोटामध्ये बी गेलं, पाहता पाहता माझंच बहारदार झाड झालं’ म्हणत बालसाहित्यही लिहितो आणि जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ… ‘तुकाराम’ही गंभीरपणे म्हणतो. त्यामुळे त्याच्या ‘तूर्तास’, ‘तत्पूर्वी’ या दोन सशक्त कविता संग्रहांनंतर येणाऱ्या ‘तथापि’ या कवितासंग्रहाबद्दल उत्सुकता होतीच.

कविता हा कथा किंवा कादंबरीसारखा एका बैठकीत संपवायचा विषय नाही. किंबहुना कविता हा बहुतकरून कवीच्या विचाराशी समवेदनेच्या भावनेतून पाहत आत्मचिंतनाच्या मार्गावर चालण्याचा विषय आहे. हाच अनुभव ‘तथापि’मधील कविता वाचताना येतो. दासू वैद्य यांच्या लिखाणाचा पिंड गंभीर आहे, बैठक सामाजिक आहे आणि शैली ही सांप्रतकालीन आहे. आडवळणाच्या अनोळखी वाटेवरसुद्धा अचानक एखाद्या ओळखीच्या नावाचा मैलाचा दगड दिसावा तसं दासू वैद्यांच्या कवितेत होतं. त्यांच्या ‘मागणं’ या कवितेत ते म्हणतात…
अवेळी आलेल्या भुकेसाठी
कोरभर कविता
झाकून ठेवलेली असावी घरोघर
लई नाही, लई नाही मागणं
फक्त पेरलेल्या दाण्याला
नित्य फुटावीत दोन कोवळी पानं आणि
माती कंटाळू नये झाडाच्या बाळंतपणाला
माती झाडाचे बाळंतपण करते हा विचार करणारा कवी हा आईमनाचाच असला पाहिजे. समाजात वाढलेले दमन, त्यायोगे आलेली असहायता यावर चिंतनशील कवी कायमच ताशेरे ओढतो. ती अगतिकता मांडताना, पदराला पुण्य कमी पडते आहे याचे शल्य डॉ. दासू वैद्य ‘जागरा’चा वेध घेतात…
समुंदरा भेटण्याला कोरडीच नदी पळे
वाळलेल्या जंगलात वणव्यात झाड जळे
सांग देवा काय पाप कशी भरेन घागर
फांदीवर लटकल्या टक्क डोळ्यांचा जागर
या कवितासंग्रहातील कविता खूप वेगळ्या धाटणीच्या आहेत. त्या आजच्या काळातील कथा आणि व्यथा आजच्याच शब्दांत मांडतात. ‘तरीही’ या कवितेत कवी म्हणतो…
मायबापांना नव्हत्या
झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्या
तरीही घरात पाळणे हललेच ना…
बेसुमार कत्तल केली झाडांची
तरीही मनात फांदी हलतेच ना…
या कविता दीर्घकालीन विचारातून, घुसमटीतून, आवेगातून प्रसवलेल्या आहेत हे जाणवत राहतं. ‘बाई’, ‘जनानखाना’ आणि ‘अहोरात्र’ या कविता तर हेलावून सोडतात. ‘बाई’ कवितेत ते म्हणतात…
नजरांचा ताप, देह झाला शाप
कपडय़ात बाई, भेगाळली
अगं अगं बाई, तुला का गं घाई
सरणात रोज झोपण्याची
या कवितासंग्रहातील बऱ्याच कविता या समाजातील विवशता अधोरेखित करणाऱ्या आहेत. वास्तवाचा आरसा दाखवणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या थेट मनाला भिडतात, कधी खिन्न करतात. जीवनाची सोपी रीत कशी असली पाहिजे ते सांगतात. ‘खोडरबर‘ ही कविता त्याचीच साक्ष.
‘ज्यांच्या जवळ आहे खोडरबर
त्यांनी खुशाल चालवावी
बेभान पेन्सिल पुढय़ातल्या कागदावर
कोऱ्या कागदाला ठेवून साक्षी
कराव्यात असंख्य चुका’
नवा दिवस हा कालचे मळभ विसरून पुन्हा नवी सुरुवात करण्याचा असतो हे सांगताना ते म्हणतात…
उगवलेल्या प्रत्येक दिवसाजवळ असतो
एक नवा कोरा कागद
फक्त आपण स्वतचा एक शब्द
पाहिजे लिहिला उगवलेल्या शुभ्र दिवसावर
आजच्या तरुणाईला आपले खोडरबर शोधता आले पाहिजे. कधी ते कुटुंबात असू शकते, मैत्रीत असू शकते, प्रेमात असू शकते. त्याच्या साथीने कालचे नैराश्य झटकून पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली पाहिजे.
मुक्तछंदातील या कविता तुम्हाला अंतर्मुख करतील. आपल्यातील माणूसपणाचा धांडोळा घ्यायला, तळ शोधायला आणि समाजशील असण्याच्या संकल्पनेला प्रश्न विचारायला भाग पडतील हे नक्की. म्हणूनच हा वाचनानुभव गमावू नये असा आहे.