
केंद्रातील मोदी सरकारचा महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव विरोधकांनी लोकसभेत हाणून पाडला. विरोधकांकडून झालेल्या पराभवानंतर शनिवारी भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर विरोध प्रदर्शन केलं. देशात देखील विविध ठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. कुठे राहुल गांधींचे पुतळे जाळले, कुठे विरोधात घोषणा दिल्या. एका बाजूला हे सगळं सुरू असताना सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी तर दुपारी काँग्रेच्या खासदार प्रियंका गांधी यांनी विरोधकांची भूमिका समजावून सांगत मोदी सरकारचे छुपे मनसुबे जनतेसमोर आणले. त्यामुळे भाजपचे नेते बिथरले. भाजपची प्रतिमा डागाळल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीच जनतेशी संवाद साधण्याच्या निमित्ताने समोर आले आणि मोदी सरकारच्या अपयशाचं खापर त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर फोडण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण भाषणामध्ये त्यांचा सगळा प्रयत्न हा विरोधकांना लक्ष्य करण्याचा राहिला. ”या विधेयकाचा ज्यांनी विरोध केला. त्यांना मी सांगू इच्छितो की ही लोकं नारी शक्तीला गृहित धरत आहेत. ही 21 व्या शतकातील स्त्री आहे. ती देशातील प्रत्येक घटनेवर नजर ठेवून आहे. तुमच्या सर्व गोष्टींवर त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे महिला आरक्षणाचा विरोध केल्याची शिक्षा त्यांना मिळेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच हे विधेयक कुणाकडूनही काही हिसकावून घेत नव्हते. ते प्रत्येकाला काही ना काही देणाऱ्यातले होते” असा दावा त्यांनी यावेळी केला.

























































