
मनात श्रद्धा आणि कष्टाची तयारी असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते, याचा प्रत्यय अहमदपूर तालुक्यातील सावरगाव (थोट) येथील रहिवासी लक्ष्मण शेंबाळे यांनी दिला आहे. व्यवसायाने भंगार खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्या शेंबाळे यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून हडोळतीसारख्या ग्रामीण भागात तब्बल 15 लाख रुपये खर्च करून साईबाबांचे एक भव्य मंदिर उभारले आहे. या मंदिराची सध्या परिसरात मोठी चर्चा होत आहे.
दहावी नापास असलेल्या लक्ष्मण शेंबाळे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांची दोन एकर शेती आणि संसाराचा गाडा हाकण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. अशा परिस्थितीत त्यांनी हडोळती येथे भंगार खरेदीचा व्यवसाय सुरू केला. पती-पत्नीची साईबाबांवर निस्सीम श्रद्धा होती. व्यवसायात जम बसत असतानाच, साईबाबांच्या कृपेने त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन इंजिनिअर झाली. मोठा मुलगा गणेश शेंबाळे महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे, तर लहान मुलगा महेश मुंबई येथे इंजिनिअर आहे. मुलांच्या या यशामुळे शेंबाळे यांची भक्ती अधिकच दृढ झाली आणि त्यांनी आपल्या शेतात साईधाम मंदिर बांधण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे, मंदिर उभारणीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता, मात्र कोणाकडूनही एक रुपयाची मदत न घेता त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून दोन वर्षांत हे मंदिर पूर्ण केले.
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर हनुमानाची मूर्ती असून गाभाऱ्यात महादेव आणि नंदीचे दर्शन घडते. मंदिराच्या मुख्य भागात गुजरातहून आणलेली साईबाबांची अत्यंत देखणी आणि रेखीव मूर्ती विराजमान आहे. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ असून, तिथे लावलेल्या विविध प्रकारच्या झाडांमुळे हा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य वाटतो. येथे दर गुरुवारी भाविकांची मोठी गर्दी असते आणि भजन, आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या मंदिराला सोमवारी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वर्धापन दिन महोत्सव साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार असून, ह.भ.प. पप्पूदेव जोशी यांचे कीर्तन होणार आहे. दुपारनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेंबाळे कुटुंबाने केले आहे.


























































