प्रवाशांना कोंबण्यासाठी लावलेल्या जादा सीट्स उखडल्या; 22 वाहनांवर कारवाई, कल्याण-मुरबाड मार्गावरील मृत्यूच्या तांडवानंतर आरटीओला जाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-मुरबाड मार्गावरील मृत्यूच्या तांडवानंतर आरटीओला अखेर जाग आली आहे. इको टॅक्सीमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी लावण्यात आलेल्या जादा सीट्स उखडल्या असून नियमांचे पालन न करणाऱ्या 22 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. फक्त पैसे कमवण्यासाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या टॅक्सीचालकांकडून आरटीओने तीन दिवस कारवाई करून 1 लाख 80 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

तीन दिवसांपूर्वी कल्याणमुरबाड मार्गावरील रायते पुलाजवळ प्रवासी कोंबलेल्या इको टॅक्सीने सिमेंट मिक्सरला धडक दिल्याने अकरा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातामुळे मुरबाड ते कल्याण दरम्यान रोज टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. या अपघातात पऱ्हे गावातील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा नाहक बळी गेला. सिमेंट मिक्सर चालकाला अटक केली असली तरी एसटीची बेफिकिरी व वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी यानिमित्ताने चव्हाट्यावर आली.

क्षमता सात प्रवाशांची, पण…

जादा पैसे कमवण्यासाठी प्रवाशांची कोंबाकोंबी करणाऱ्या टॅक्सीचालकांवर आरटीओने आता कारवाई सुरू केली आहे. कल्याण-मुरबाड व कल्याण भिवंडी या मार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत असून आज बारा ओम्नी टॅक्सीचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रवाशांची क्षमता सहा ते सात एवढी असतानाही प्रत्यक्षात बाराहून अधिक जणांना दाटीवाटीने बसवण्यात येत होते. आज आरटीओच्या विशेष पथकाने मोहीम राबवून टॅक्सीमध्ये लावलेल्या अतिरिक्त सीट्स उखडून फेकून दिल्या असल्याची माहिती आरटीओचे अधिकारी आशुतोष बारकुल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

सरकारने वाऱ्यावर सोडले; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले

रायते पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून अद्याप मदतीचा छदामही मिळालेला नाही. मुरबाडच्या देवराळवाडी येथील गणपत मधे यांचादेखील या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. राष्ट्रहितम डीईएफ फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली, तर एकाच कुटुंबातील मृत्युमुखी पडलेल्या स्नेहा मोहिते, मानसी मोहिते, प्रमेश मोहिते यांच्या मातोश्री सुजाता मोहिते यांना स्थानिक क्रिकेट क्लबच्या तरुणांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला.