गंभीर आजारावरील उपचारासाठी दरमहा आर्थिक मदत, निवृत्त सेवकांसाठी राज्य सहकारी बँकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मानवी दृष्टीकोनातून सर्व माजी सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी संवेदनशील निर्णय घेतला आहे. बँकेमधील निवृत्त सेवकांना वृध्दापकाळात उद्भवणाऱया गंभीर आजारावरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य बँक माजी सेवक आधार योजना लागू करण्यास प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गंभीर आजार असलेल्या माजी सेवकांना सेवक कल्याण निधीतून दरमहा 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सेवा निवृत्तीनंतर उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने, अशा उपचारांचा आर्थिक भार मोठा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन बँकेने ही योजना आपल्या माजी सेवकांना लागू केली आहे, अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. यामुळे निवृत्त सेवकांना औषधोपचारासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळणार आहे. यासाठी गरजू माजी सेवकांनी बँकेच्या मुंबई येथील कार्यालयाशी अथवा राज्यातील बँकेच्या सर्व विभागीय कार्यालयांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.