‘अण्णा’चे नवे रूप पाहून बीडकर दचकले! केस पिकले, दाढी वाढली, खांदे वाकले… आजारपणामुळे रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना फोनचे आकर्षण असते. काही फोनची आतुरतेने वाट पाहिली जाते. काही फोन वेदना घेऊन येतात. पण एक फोन असा होता की तो कधीच येऊ नये असे बीडकरांना वाटत होते! त्या फोनची दहशतच अशी होती! वाल्मीक कराडचा फोन ! पण आता ही दहशत, दरारा पार लयाला गेला आहे. म्लान चेहरा, पिकलेले केस आणि वाकलेले खांदे… असे वाल्मीकअण्णाचे नवे रूप पाहून बीडकर थक्क झाले! आजारपणामुळे वाल्मीक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक सलाईन लावून त्याला सोडण्यात आले.

परळीच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचे बस्तान बसले आणि वाल्मीक कराड हा दहशतीचा तारा बीडच्या नभांगणावर उगवला. ‘अण्णा’ म्हटले की चळाचळा कापायला व्हायचे. अण्णांचा फोन आला की भल्याभल्यांना घामाच्या धारा लागत. गुत्तेदार असो, अधिकारी असो, की कंपनीवाला… अण्णाच्या दरबारात सर्वांचा मुजरा ठरलेला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीला विरोध केला म्हणून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले आणि बीडकर सुन्न झाले. दीड वर्षापासून वाल्मिक कराड बीडच्या कारागृहात आहे.

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी संपूर्ण रस्ताभर प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती. गाडीतून उतरलेल्या वाल्मिक कराडला बीडकरांनी पाहिले अन् त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! म्लान झालेला चेहरा, वाढलेली दाढी, डोक्यावरचे पिकलेले केस आणि वाकलेले खांदे… अण्णाचे हे रूप पाहून त्याचे कार्यकर्तेही दचकले.

वाल्मिक कराडची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर काही चाचण्याही करण्यात आल्या. सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आल्यानंतर एक सलाईन लावून वाल्मिक कराडची रवानगी पुन्हा जिल्हा कारागृहात करण्यात आली. त्याला डायबेटिज, रक्तदाबाचा त्रास आहे.