अर्थनंतर आता भाजपचा सहकारवर डोळा, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रवीण दरेकरांना शुभेच्छा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अर्थ खाते भाजपने खेचून घेतल्यानंतर आता सहकार खात्यावरही डोळा असल्याचे स्पष्ट झाले. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज राज्य सहकारी संघाच्या कार्यक्रमात प्रवीण दरेकर हे कॅबिनेट मंत्री होतील. सहकार विभाग हा त्यांच्याकडेच जाईल अशा शुभेच्छा देताना ते सहकार मंत्री होण्याचे सूतोवाच केले.

राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वंय-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे कॅबिनेट मंत्री दर्जा अध्यक्ष असलेले दरेकर यांच्या नावासमोरचा दर्जा हा शब्द लवकरात लवकर जावा एकदा का तो दर्जा शब्द गेला की ते कॅबिनेट मंत्री होतील. सहकार विभाग हा त्यांच्याकडेच जाईल असे वक्तव्य केले. त्यामुळे अर्थ खात्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले सहकार खाते लवकरच भाजपकडे येणार असल्याची चर्चा सहकारी संघाच्या कार्यक्रमात सुरू झाली. याबद्दल कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, भाषणात असं बोलायचं असतं अशी प्रतिक्रिया दिली. तर दरेकर यांनी माहितीत अशी कोणतीही मंत्रिपदाची खेचाखेची सुरू नाही. समन्वयाने काम सुरू आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला असल्याची सारवा सारव केली.

राज्यात आपण आपले वेगळे सहकार विद्यापीठ काढू शकतो का? याचा अभ्यास करून निर्णय घेऊ, सहकार संघासाठी बजेटमध्ये तरतूद करू. तसेच नफा कमावणाऱ्या सहकारी संस्थांना भार वाटणार नाही, इतके नाममात्र शुल्क आकारून सहकार प्रशिक्षण देता यावे यासाठी सहकार आयुक्तांना शिक्षण निधीचा प्रस्ताव त्वरित पाठविण्याची सूचना केल्याचे पाटील यांनी भाषणामध्ये बोलताना सांगितले.

संघाच्या संचालक मंडळाच्या सभागृहाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार सुनील कांबळे, सहकार आयुक्त दीपक तावरे, संघाचे संचालक संजीव कुसाळकर, शिवाजीराव नलावडे व अन्य संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.