कमाल आहे! मे महिन्यात कमी उकडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या तापमानात वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यभरात उष्म्याचा त्रास होतोय. हा तर एप्रिल महिना आहे, मे महिन्यात काय होईल, ही भीती आहे. अशातच मार्च-एप्रिलच्या तुलनेत मे महिना थोडा दिलासा देणारा ठरू शकेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

उष्णतेच्या लाटा, आरोग्य आणि हवामान वार्तांकन या विषयावर भारतीय हवामान विभाग, ‘असर सोशल इम्पॅक्ट अ‍ॅडव्हायजर्स’ आणि ‘मुंबई प्रेस क्लब’ यांच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख बिक्रम सिंह यांनी याबद्दल माहिती दिली. काही दिवस सरासरीपेक्षा थोडे जास्त कमाल तापमान नोंदले गेले तरी मार्चप्रमाणे त्रासदायक परिस्थिती निर्माण होणार नाही. किनारपट्टीच्या भागामध्ये आता समुद्रावरून येणाऱ्या हवेचा परिणाम दिसू लागेल, त्यामुळे कमाल तापमान फार चढणार नाही, असे सिंह यांनी सांगितले.

मार्च महिना आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसांतील तापमानवाढीच्या तुलनेत येत्या काही दिवसांत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत तापमानात घसरण होईल. बहुतांश जिह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.