राष्ट्रध्वज जाळल्याप्रकरणी दिल्लीतील तरुण गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज जाळून तो कचऱयात फेकल्या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी दिल्ली येथील तरुणाला अटक केली आहे. ही घटना 16 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चाकण येथे ठाकरवस्ती चौकात घडली होती.

असिफ शेख (29) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बीएनएस कलम 196, राष्ट्रीय सन्मान प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजनीश सीताराम राजभर (31) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी राजभर यांचे चाकण मधील ठाकरवस्ती येथे भाजी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाजवळील चिकनच्या दुकानात आरोपी असिफ हा एक वर्षापूर्वी काम करत होता. त्याने काम सोडले होते. 16 एप्रिल रोजी तो दारूच्या नशेत राजभर यांच्या दुकानाजवळ आला. त्याने सोबत देशाचा राष्ट्रध्वज आणला होता. त्याने राष्ट्रध्वज जाळला. अर्धवट जळालेला राष्ट्रध्वज पायाने विझवून तो कच्रयाच्या डब्यात टाकला. हा प्रकार राजभर यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी असिफ याला अटक केली आहे. दक्षिण चाकण पोलीस तपास करीत आहेत.