
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट केंद्रीय अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे. ड्रोन आयात आणि इतर तांत्रिक मंजुरीसाठी अडीच लाख रुपयांची घेताना डीजीसीएचे उपमहासंचालक मुदावत देवुला आणि एका नामांकित कॉर्पोरेट समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत माथूर यांना सीबीआयने रंगेहाथ अटक केली आहे. रविवारी अधिकार्यांनी या कारवाईची माहिती दिली. यामुळे एकच खळबळ उडाली असून डीजीसीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे.
एका खासगी एरोस्पेस कंपनीचे ड्रोन आयातीशी संबंधित अर्ज आणि इतर परवानग्या डीजीसीएकडे प्रलंबित होत्या. या परवानग्या मिळवून देण्यासाठी उपमहासंचालक मुदावत देवुला यांनी लाचेची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत सीबीआयने 18 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल केला होता. शनिवारी सापळा रचून सीबीआयने या दोन्ही आरोपींना अडीच लाखांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
सीबीआयने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, अटकेनंतर दिल्लीतील चार विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान 37 लाख रुपयांची रोकड, मोठ्या प्रमाणात सोन्याची आणि चांदीची नाणी, तसेच अनेक डिजिटल उपकरणे, कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी सीबीआयकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले भरत माथूर हे एका मोठ्या कॉर्पोरेट समूहात वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. एका खासगी एरोस्पेस कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्याला लाच दिल्याचे तपासात समोर आले आहे. सरकारी परवानग्यांच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्यांविरुद्ध ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली रक्कम आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे सीबीआयने म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

























































