
‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटातील गाणी गाजल्यानंतर, पंजाबी गायिका जस्मिन सँडलस सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिने शाश्वत सचदेवच्या संगीत अल्बममधील अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. ही सर्वच गाणी गाजली. नुकत्याच एका पाॅडकास्टमध्ये जस्मिनला लागलेल्या दारूच्या व्यसनावर ती अगदी दिलखुलासपणे बोलली आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर गायिकेने तिच्या कारकिर्दीबद्दल, आयुष्याबद्दल आणि गायनाच्या प्रवासाबद्दल सांगितले. केवळ इतकेच नाही तर, तिला लागलेल्या दारूच्या व्यसनाबद्दलही आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षावरही कोणताही आडपडदा न ठेवता भाष्य केले आहे. जस्मिनने धुरंधर चित्रपटातील पहिल्या भागात तिने शरारत सारखे गाणे गायले. तर दुसऱ्या भागात तिने आरी आरी, मैं और तू, जाईये सजना आणि रंग दे लाल ही गाणी गायलेली आहेत.
पाॅडकास्टमधील संभाषणादरम्यान, जस्मिनने सांगितले की, तिचे बालपण हे खूप संघर्षमय होते. ती म्हणाली की, हा संघर्ष अजूनही कायम आहे. यासंदर्भात अधिक बोलताना ती म्हणते, “आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. हा काळ केवळ पालकांसाठीच नाही, तर मुलांसाठीही खूप कठीण असतो. आपल्याला मार्गदर्शन आणि संगोपनाची गरज असते. पालक आपल्या मुलांसोबत इतके कठोर का वागतात? जेव्हा आयुष्य खरोखरच कठीण होते, तेव्हा आपण आधाराची अपेक्षा करतो.”
नवभारत टाइम्सने, दिलेल्या वृत्तानुसार जस्मिन म्हणते, माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी एकाच वेळी घडल्या होत्या. एकीकडे मी प्रसिद्ध होते, तर दुसरीकडे मी अनेक भावनिक चढ-उतारांमधून जात होते. माझे कौटुंबिक नातेसंबंध तुटले होते, माझ्या वडिलांचे निधन झाले होते, आणि मी यशस्वीही झाले होते. या सर्व घडामोंडींदरम्यान मी खूप अति प्रमाणात मद्यपान करायचे, आज मात्र त्या गोष्टीचा मला पश्चाताप होतो. मी दारू पीत असताना त्या २-३ वर्षांत केलेल्या काही गोष्टींचा मला पश्चात्ताप होतो. पण त्यावेळी मद्यपान माझ्यासाठी खूप गरजेचे होते.
ती पुढे म्हणाली, “लहानपणी मला माझ्या आई-वडिलांकडून अनेकदा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यांनी नकळतपणे का होईना अनेकदा माझे मन मोडले होते, त्यामुळेच माझ्या मनात त्यांच्याविषयी कटुता निर्माण झाली.” माझे त्यांच्यावर प्रेम आहे, पण जेव्हा एखाद्या लहान मुलाचे हृदय तुटते, तेव्हा ते तसेच तुटलेले राहते. जेव्हा तुमच्याकडे कोणतीही सुरक्षित जागा नसते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत ती सुरक्षित जागा शोधत असता. मी आयुष्यभर तेच करत आले आहे, फक्त घराची ओढ आणि सुरक्षित जागेचा शोध…
जस्मिनने या पाॅडकास्टच्या माध्यमातून ती कशी तिच्या आयुष्यात भावनिक चढ उतारांना सामोरी गेली, यावर बिनदिक्कतपणे भाष्य केले आहे. जस्मिनचा जन्म जालंधरमध्ये झाला आणि ती कॅलिफोर्नियामध्ये वाढली. तिने २००८ मध्ये ‘मुस्कान’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर बोहेमियासोबत ‘गुलाबी’ या अल्बमवर काम केले होते.





























































