
पराभवांच्या मालिकेत अडकलेल्या कोलकात्याने अखेर विजयाचे खाते उघडत थरारक लढतीत राजस्थानवर चार विकेट्सनी मात केली. सात सामन्यांनंतर मिळालेला हा पहिला विजय कोलकात्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि विजयानंद देणारा ठरला. संकटात सापडलेल्या संघाला रिंकू सिंह आणि अनुकूल रॉय या जोडीने सावरत शेवटचे दोन चेंडू असताना विजय मिळवून दिला.
156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात धक्कादायक ठरली. पहिल्याच चेंडूवर टिम सायफर्ट बाद, त्यानंतर अजिंक्य रहाणेही शून्यावर परतला. पॅमरन ग्रीनने 27 धावांची झुंज दिली, पण त्यानंतर अंगकृष रघुवंशी (10), रोव्हमन पॉवेल (23) आणि रमनदीप सिंह (10) हेही स्वस्तात बाद झाले. 85 धावांवर सहा विकेट्स गमावलेल्या कोलकात्याचा पराभव जवळपास निश्चित वाटत होता.
पण इथून पुढे रंगला ‘रिंकू शो’. अनुकूल रॉयला सोबत घेत रिंकूने खेळाची दिशा बदलली. दोघांनी शांतपणे आणि अचूक फटकेबाजी करत 76 धावांची नाबाद भागीदारी रचत कोलकात्याला विजयाच्या ट्रकवर आणले. रिंकूने 34 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 53 धावा करत संघाला विजय मिळवून दिला, तर अनुकूलने 16 चेंडूंत 29 धावा करत उत्तम साथ दिली. शेवटी रिंकूच्या विजयी षटकाराने कोलकात्याच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष उसळला.
याआधी राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 155 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी (46) आणि यशस्वी जैसवाल (39) यांनी जोरदार सुरुवात करून दिली, पण त्यानंतर कोलकात्याच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. दमदार सलामीनंतर राजस्थानच्या डावाला एकाही फलंदाजाची साथ न लाभल्यामुळे त्यांचा संघ 9 बाद 155 पर्यंतच पोहोचू शकला. वरुण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत राजस्थानचा डाव रोखला, तर सुनील नारायणने दोन महत्त्वाचे विकेट टिपले.


























































