
आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पंजाब किंग्जने धावांचीच नव्हे तर 21 षटकारांची उधळण करत आयपीएलमध्ये नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखली. सलामीवीर प्रियांश आर्य आणि कुपर कोनोली यांच्या 182 धावांच्या विक्रमी भागीच्या जोरावर यंदाच्या आयपीएलमधील 254 ही सर्वोच्च धावसंख्या उभारल्यानंतर त्यांनी लखनौला 200 धावांवर रोखत 54 धावांची दणदणीत विजय मिळवत पाचवा विजय नोंदवला. या विजयासह पंजाब आयपीएलमध्ये अपराजित असलेला एकमेव संघ असून त्यांनी आपले अव्वल स्थानही कायम राखले आहे.
पंजाबने उभारलेल्या 255 धावांच्या एव्हरेस्टचा पाठलाग करताना लखनौने आपली पूर्ण ताकद लावली. पण मिचेल मार्श (40), आयुष बदोनी (35) आणि कर्णधार ऋषभ पंत (43) यांच्या घणाघातीने लखनौला दहाव्या षटकांतच शंभरी गाठून दिली. मात्र त्यानंतर मार्श आणि पंत बाद झाले आणि त्यांच्या धावांच्या वेगाला ब्रेक बसला जो पुन्हा उठलाच नाही. तिथेच पंजाबने लखनौला पराभव दाखवला. शेवटी एडन मारक्रमने 42 धावा ठोकल्यामुळे लखनौ 200 पर्यंत पोहोचला.
त्याआधी प्रभसिमरन सिंग पहिल्याच षटकांत बाद झाल्यानंतर प्रियांश आर्य आणि कुपर कोनोली यांनी लखनौच्या गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत षटकार-चौकारांची आतषबाजी केली. दोघांच्या झंझावाती खेळीमुळे दोघेही शतकाच्या समीप पोहोचले, पण दोघांचेही शतक थोडक्यात हुकले. प्रियांशचे वादळ 37 चेंडूंत 9 षटकार आणि 4 चौकार खेचून 93 धावांवर शांत झाले तर कोनोलीने 87 धावा ठोकल्या. दोघांनी दुसऱया विकेटसाठी 183 धावांची विक्रमी भागी रचली. मात्र दोघे 4 चेंडूंत बाद झाल्यानंतर पंजाबला 300 धावांचा टप्पा गाठणे जमले नाही.


























































