
हवाई दलाच्या गरुड स्पेशल तुकडीला अत्याधुनिक ड्रोन मिळणार आहेत. दुर्गम डोंगर, बर्फाचे भव्य पहाड व कठीण हवामानात कार्यरत राहण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. हिंदुस्थानच्या दुश्मनांवर करडी नजर ठेवण्यासाठी या ड्रोनचा फायदा होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा ड्रोन 16 हजार 400 फूट उंचीवरून भूभाग स्पष्टपणे टिपू शकतो. याला अत्याधुनिक यंत्रणा जोडलेल्या आहेत. या यंत्रणांमुळे सीमा भागातील अगदी छोटी हालचाही सहज लक्षात येऊ शकेल. तसेच हा ड्रोन मायनस 20 ड्रिगी व प्लस 50 डिग्री सेल्सियसमध्ये काम करणारा आहे. बर्फाळ भागापासून वाळवंटातही काम करेल.
मायक्रो यूएव्ही सिस्टम या नावाने हा ड्रोन प्रचलित आहे. आखाती युद्धामुळे देशाची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने या ड्रोनची खरेदी प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे.
दोन जवान हाताळू शकतात
हा ड्रोन दोन जवान सहजपणे हाताळू शकतात. ऑटो टेक ऑफ व लँडिंगची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. हा ड्रोन अचूक टार्गेट ट्रकिंग करू शकतो. या ड्रोनचे विविध फायदे आहेत, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
स्वदेशी बनावट
‘आत्मनिर्भर भारत मिशन’ अंतर्गत या ड्रोनच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे. या ड्रोनमध्ये 60 टक्के हिंदुस्थान निर्मित फिचर्स ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. हिंदुस्थानी कंपन्यांना या प्रोजेक्टमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
























































