IPL 2026 – अय्यरकडे दुर्लक्ष महागात पडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल 2025 पासून ते आयपीएल 2026 पर्यंत श्रेयस अय्यर अक्षरशः ‘झोन’मध्ये खेळत असून त्याच्या फलंदाजीची धार आणि पंजाब किंग्सचे निकाल यावरून ते ठळकपणे दिसून येत आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही अय्यरच्या या जबरदस्त फॉर्मची दखल घेत त्याला हिंदुस्थानच्या टी-20 संघात स्थान मिळायलाच हवे, असा सूर पुन्हा एकदा आळवला आहे. ‘टाइम आऊट’ या कार्यक्रमात बोलताना अश्विन म्हणाला, मी फक्त धावा किंवा चौकार-षटकार पाहत नाही, तर क्रीजवर अय्यरची उपस्थितीच वेगळी भासते. तो गार्ड घेतो तेव्हा तो पूर्णपणे एका वेगळय़ाच झोनमध्ये दिसतो. क्रिकेटपटूच्या कारकीर्दीत असा काळ फार थोडा येतो, जेव्हा सगळं काही परफेक्ट चालतं-तुमचं खाणं, झोप, सराव आणि नेट्समधला खेळ तसाच सामन्यात उतरतो. अय्यरने आपल्या शेवटच्या तीन डावांत 50, नाबाद 69 आणि 66 धावा करत तुफानी फॉर्म दाखवला आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 187.96 आहे. अश्विनच्या मते, अय्यरची केवळ उपस्थितीच गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करते. स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची त्याची भूक विलक्षण आहे. अनेक खेळाडू स्वतःच्या ताकदीवर खेळतात, पण कमजोरी सुधारण्याची हिंमत फार थोडय़ांत असते.

अश्विन पुढे म्हणाला, ‘महान बनायचं असेल तर कमजोरीवर काम करावं लागतं आणि अय्यरने ती वाट धरली आहे. तो शॉर्ट बॉल खेळू शकत नाही, असं म्हटलं जायचं. पण आता तो त्याच चेंडूंवर षटकार ठोकतोय. जसप्रीत बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजावर मिडविकेटवरून पुल मारणं हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जर अय्यरला मोठय़ा संधी मिळाल्या नाहीत तर ते त्याचे नुकसान नसेल, तो हिंदुस्थानचा तोटा असेल. कारण आपण त्याच्याकडून राष्ट्रीय संघासाठीही तसाच खेळ पाहू शकत नाही. आता गोलंदाज त्याला शॉर्ट बॉल टाकायलाच घाबरतात. कारण त्यांना माहिती आहे, तो त्याचा फटका ठोकणारच.

आयुष म्हात्रेच्या दुखापतीने चेन्नईची चिंता वाढली

चेन्नई सुपर किंग्सच्या (सीएसके) छावणीत मोठा धक्का बसला आहे. दमदार फॉर्मात असलेला युवा धडाकेबाज फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अडचणीत सापडला आहे. त्याची दुखापत गंभीर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विकेटदरम्यान धावताना त्याला त्रास होताना दिसले. त्याच्या दुखापतीने सीएसकेच्या दुखण्यात आणखी वाढ झाली आहे. सीएसके फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनी सामन्यानंतर स्पष्ट केले की, आयुषला हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आला आहे. नेमकी गंभीरता स्पॅननंतरच कळेल, पण सध्या तरी ही दुखापत गंभीर वाटत असल्याचे हसी यांनी सांगितले. आयुषचा अलीकडील फॉर्म पाहता त्याची गैरहजेरी सीएसकेसाठी मोठा धक्का ठरू शकते, असेही त्यांनी मान्य केले. या सामन्यात सीएसकेला 10 धावांनी पराभव पत्करावा लागला, पण आयुषने केवळ 13 चेंडूंत 30 धावांची तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. याआधीही त्याने कोलकात्याविरुद्ध 17 चेंडूंत 38, दिल्लीविरुद्ध 59 आणि पंजाबविरुद्ध 73 धावा करत सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली होती.