
पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यास इराणने नकार दिला आहे. अमेरिकेच्या अवाजवी मागण्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिका यामुळे इराणने चर्चेस नकार दिला आहे. अशातच अमेरिकन नौदलाने ओमानच्या समुद्रामध्ये मोठी कारवाई करत इराणचे मालवाहू जहाज जप्त केले आहे. अमेरिकेच्या या कारवाईचा इराणने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून ही समुद्री चाचेगिरी असल्याचे म्हटले. तसेच इराणने अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन हल्ले केले. यामुळे आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत.
इराणचा ध्वज असलेले एम/व्ही तुस्का हे मालवाहू जहाज बंदर अब्बासच्या दिशेने जात होते. अमेरिकेने इराणवर टाकलेल्या नौदल नाकेबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकन युद्धनौका यूएसएस स्प्रुआन्सने या जहाजाला रोखले. या जहाजाला 6 तास सतत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र जहाजाच्या कप्तानाने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी माहिती अमेरिकन संरक्षण विभागाने दिली.
जहाज थांबत नसल्याचे पाहून अमेरिकन नौदलाने आक्रमक पाऊल उचलले. नौदलाने जहाजावरील कर्मचाऱ्यांना इंजिन रूम रिकामी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर युद्धनौकेवरील 5-इंची एमके 45 तोफेने जहाजाच्या इंजिन रूमवर थेट गोळीबार केला. यामुळे जहाजाची प्रवेग यंत्रणा निकामी झाली आणि जहाज भर समुद्रात थांबले. त्यानंतर अमेरिकेच्या 31 व्या मरीन एक्स्पिडिशनरी युनिटच्या जवानांनी जहाजावर उतरून त्याचा पूर्ण ताबा घेतला.
U.S. forces operating in the Arabian Sea enforced naval blockade measures against an Iranian-flagged cargo vessel attempting to sail toward an Iranian port, April 19.
Guided-missile destroyer USS Spruance (DDG 111) intercepted M/V Touska as it transited the north Arabian Sea at… https://t.co/iyzOQd93C3 pic.twitter.com/HwU4XS48Oq
— DOW Rapid Response (@DOWResponse) April 19, 2026
IRGC ने डागले ड्रोन
मालवाहू जहाजावर झालेल्या या कारवाईचा इराणने तीव्र शब्दांमध्ये निषेध करत अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकन युद्धनौकांच्या दिशेने ड्रोन डागले. अमेरिकन नौदलाला या कारवाईनंतर माघार घ्यावी लागली, असे इराणच्या माध्यमांनी म्हटले आहे. तसेच इराणच्या खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टरने या संदर्भात पत्रक काढले आहे. अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन केले असून जहाजावरील कारवाई ही सागरी चाचेगिरी आहे. इराणचे सशस्त्र दल या चाचेगिरीला लवकरच चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भर समुद्रात काय घडले, ट्रम्प यांनी सांगितले
दरम्यान, या घटनेनंतर इराणनेही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे बोट्सवाना आणि अंगोलाचे दोन तेलवाहू टँकर अडवून त्यांना परत माघारी फिरण्यास भाग पाडले. दुसरीकडे अमेरिकन नौदलाने केलेल्या करावाईचे अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. ‘900 फूट लांब आणि विमानवाहू युद्धनौकेएवढे वजन असलेल्या इराणच्या तुस्का या जहाजाने नाकेबंदी मोडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन युद्धनौका यूएसएस स्प्रुआन्सने हे जहाज अडवले आणि थांबण्याची स्पष्ट ताकीद दिली. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अमेरिकन नौदलाने गोळीबार करत इंजिन रुमला छिद्र पाडले आणि जहाज रोखले. सध्या या जहाजाचा ताबा मरीन कॉर्प्सकडे असून जहाज पूर्णपणे आमच्या ताब्यात आणि जहाजावरील मालाची तपासणी सुरू आहे’, असे ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करून सांगितले.




























































