
तरुण वयात, विशेषतः तीशीच्या आसपास रक्तदाब किंचित वाढला तरी भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, अशी माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. सामान्य समजल्या जाणाऱ्या पातळीत असलेला रक्तदाबही पूर्णपणे सुरक्षित नसून त्यात होणारी वाढ दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करू शकते, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
या संशोधनात सुमारे 6,000 प्रौढ व्यक्तींचा 20 वर्षांहून अधिक काळ अभ्यास करण्यात आला. त्यातून असे आढळले की सिस्टोलिक रक्तदाबात प्रत्येक 10 mm Hg वाढ झाल्यास हृदयविकाराचा धोका सुमारे 20 ते 22 टक्क्यांनी वाढतो. हा अभ्यास American Journal of Hypertension मध्ये प्रसिद्ध झाला असून, या निष्कर्षांमुळे तरुण वयातील रक्तदाबाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, हा धोका पुरुष आणि महिलांमध्ये समान प्रमाणात आढळला असून, तरुणांमध्ये हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित राहतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दिल्लीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मोहित गुप्ता यांनी सांगितले की, रक्तदाबाचा धोका फक्त 140/90 mmhg नंतरच सुरू होतो, हा समज आता चुकीचा ठरला आहे.रक्तवाहिन्यांवरील परिणाम यापेक्षा खूप आधी सुरू होतात. रक्तदाब हा ठरावीक मर्यादेवर थांबत नाही, तर तो सतत वाढणारा जोखमीचा घटक आहे. मात्र या निष्कर्षांबाबत घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले, “दीर्घकालीन कालावधीत 20 टक्के वाढ हा सापेक्ष धोका आहे. निरोगी 30 वर्षीय व्यक्तीसाठी प्रत्यक्ष धोका कमीच असू शकतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही किंवा लगेच औषधोपचार सुरू करण्याची गरज नाही,” असे त्यांनी नमूद केले.
न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांच्या मते, तरुणांमध्ये रक्तदाबात होणारी अगदी थोडी वाढही दुर्लक्षित करता कामा नये. हा धोका आपण समजतो त्यापेक्षा लवकर सुरू होतो आणि पुरुष-स्त्रिया दोघांमध्येही समान असल्याने, इस्ट्रोजेनमुळे मिळणारा संरक्षणात्मक फायदा काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नियंत्रण मध्यम वयानंतर नव्हे, तर लवकर सुरू करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि रक्तदाबाचे वेळोवेळी परीक्षण या गोष्टींवर त्यांनी विशेष भर दिला.
या अभ्यासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे तरुणांमध्ये डायस्टोलिक रक्तदाब आधी वाढण्याची शक्यता. मात्र, यामुळे लगेच औषधोपचार सुरू करावेत असा निष्कर्ष काढता येत नाही. “
फक्त डायस्टोलिक रक्तदाब वाढला म्हणून लगेच औषधोपचार सुरू करण्याची गरज असल्याचे ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाहीत,” असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.

























































