जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, 15 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात भीषण अपघात घडला असून रामनगरहून उधमपूरकडे जाणारी प्रवासी बस नियंत्रण सुटून कानोटे गावाजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य हाती घेतले. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू असून गंभीर जखमींना हवाईमार्गे हलवण्याची तयारीही करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या घटनेनंतर उधमपूरचे जिल्हाधिकारी मिंगा शेर्पा यांच्याशी तातडीने संपर्क साधला. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले की, “कानोटे गावाजवळ झालेल्या या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच मी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जखमींना वैद्यकीय मदत पुरवली जात असून गंभीर जखमींना एअरलाईफ्ट करण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि आमचे कार्यकर्ते यांच्याशी सतत संपर्कात आहे.”

प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात येत आहे. गंभीर जखमींच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था केली जात असून आवश्यकतेनुसार त्यांना हवाईमार्गे इतर ठिकाणी हलवले जाणार आहे.

दरम्यान, या अपघातामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी बसचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.