
भारतीय जनता पक्षाचे कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी परशुराम जयंतीनिमित्त अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमामध्ये आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. तुम्ही 75 काय, 175 वर्षे आरक्षण घ्या. पण आम्हाला त्याची गरज नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मंडल आयोग आणि जातीच्या राजकारणामुळे अनेक पारंपरिक समाज आजही विकासापासून दूर असल्याचे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले. आयोगाच्या माध्यमातून काही वर्गांना नक्कीच फायदा झाला आहे. परंतु कुंभार, सुतार आणि तेली यांसारख्या पारंपरिक व्यवसायांशी संबंधित समुदाय आजही अपेक्षित विकासापासून वंचित आहेत. आरक्षणांनंतरही समाजाचा एक मोठा भाग मागे राहिला असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले वर्ग आणि मागे पडलेले लोक यांच्यातील दरीवर गंभीर मंथन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संविधान केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच नाही, तर 242 खासदारांनी मिळून बनवले होते, असेही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी बहुजन समाजाचे संस्थापक कांशीराम यांचा समाजसेवक म्हणून उल्लेख केला, मात्र जातीवर आधारित राजकारणाने समाजाची फाळणी केल्याचेही ते म्हणाले. मी कोणत्याही समाजाचा विरोधी नसून केवळ समान संधीचा समर्थक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.


























































