भाजपच्या आमदार पुत्राने भरधाव गाडी चालवत पाच जणांना चिरडले, आमदाराची पोलिसांनाच धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील आमदार प्रीतम लोधी यांच्या मुलाने थार गाडीने पाच जणांना चिरडले आहे. यात पाचही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत होते तेव्हा आमदार लोधी यांनी पोलिसांनावर अरेरावी करत त्यांनाच धमकी दिली आहे. करेरा पोलिसांच्या बापाचा आहे का असे या आमदाराने म्हटले आहे.

16 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजता करेरा परिसरात हा अपघात घडला. फिर्यादी संजय परिहार हे आशिष परिहार आणि अंशुल परिहार यांच्यासोबत दुचाकीवरून तहसील कार्यालयाकडे जात होते. त्यांच्या पुढे सीता वर्मा आणि पूजा सोनी या दोन महिला पायी चालत होत्या. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या थार गाडीने प्रथम त्या महिलांना धडक दिली आणि नंतर दुचाकीला धडक देत पाचही जणांना जखमी केले, अशी नोंद पोलिसांच्या एफआयआरमध्ये आहे.

अपघातानंतर सुरुवातीला आमदार प्रीतम लोधी यांनी जबाबदारीची भूमिका घेतल्याचे दिसून आले. “माझ्यासाठी मुलगा किंवा कुटुंबापेक्षा जनता महत्त्वाची आहे. पोलिसांनी पीडितांना न्याय द्यावा,” असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते. त्यांच्या या भूमिकेचे त्या वेळी स्वागतही झाले होते. मात्र काही दिवसांतच त्यांनी पूर्णपणे यू-टर्न घेतला.

यानंतर त्यांनी पोलिसांवर थेट टीका करत करेरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष जाखर यांच्यावर कठोर शब्दांत हल्ला चढवला. “करेरा तुमच्या बापाचं आहे का? माझा मुलगा पुन्हा करेराला येईल आणि निवडणूक लढवेल. दम असेल तर अडवून दाखवा,” अशा शब्दांत त्यांनी उघड आव्हान दिले. तसेच तपासात पक्षपातीपणा झाला तर तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर दिनेश लोधी हा त्याच थार गाडीत पोलीस ठाण्यात दाखल झाला. विशेष म्हणजे त्या वाहनावर नंबर प्लेट नव्हती, काचांवर बेकायदेशीर काळी फिल्म होती आणि हूटर बसवलेला होता. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गाडीवर दंड आकारला.

चौकशीदरम्यान दिनेश लोधी याने वारंवार हॉर्न आणि सायरन वाजवूनही समोरील लोकांनी रस्ता न दिल्याने ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचा दावा केला. मात्र पोलिस तपासात वाहनातील बेकायदेशीर बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

आमदार प्रीतम लोधी यांनी आपल्या बचावात सांगितले की, त्यांनीच पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून एफआयआर नोंदवण्यास मदत केली आणि मुलाला चौकशीसाठी पाठवले. मात्र अपघातातील जखमींनी वेगळीच बाजू मांडली आहे. “अपघातानंतर आमची विचारपूस करण्यासाठी कोणीही आले नाही,” असे एका पीडिताने सांगितले.

या प्रकरणामुळे आरोपी आणि त्याच्या कुटुंबाच्या भूतकाळावरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दिनेश लोधी याच्याविरोधात यापूर्वी धमकी देणे, वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे नोंदवले गेले आहेत. काही प्रकरणांत त्याला अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागल्याचे समोर आले आहे. तसेच खंडणीच्या आरोपांचाही उल्लेख आहे.

आमदार प्रीतम लोधी यांच्यावरही दंगल, मारहाण, खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते, मात्र निवडणुकीपूर्वी त्यांचा पुनर्विचार करून त्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले.