
हैदराबाद येथून रविवारी (19 एप्रिल) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास Fly 91 चे विमान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणास सज्ज झाले होते. हे विमान सायंकाळी ४:३० वाजता हुबळी येथे उतरणार होते. मात्र, विमान हुबळीच्या जवळ पोहोचत असतानाच, त्यात अचानक काही तांत्रिक समस्या समोर आली. त्यामुळे विमानाचे लॅंडिंग रद्द करावे लागले. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि सुरक्षित लँडिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, हे विमान जवळपास चार तास हवेतच राहिले. या दरम्यान हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या शहरावरून घिरट्या घालु लागले.
NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, विमान काही तास हवेत राहिल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. याच विमानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमान हवेत घिरट्या घालत असताना, विमानातील सर्व प्रवासी आपल्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये प्रवासी किंचाळताना, देवाला प्रार्थना करताना आणि रडताना दिसत होते. त्यावेळी वैमानिक प्रवाशांना धीर देत होते. सध्या आपण हवेतच आहोत, आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती देत राहू.. कृपया धीर धरा आणि सूचनांचे पालन करा अशा सूचना वैमानिकांकडून प्रवाशांना देण्यात येत होत्या.
दरम्यान, प्रवाशांच्या नातेवाईकांनी ‘Fly91 Airlines’ विरोधात संताप व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी निष्काळजीपणाचा आरोप करत म्हटले की, त्यांना विमानाबाबत कोणतीही योग्य आणि अद्ययावत माहिती पुरवण्यात आली नव्हती. या तणावाच्या क्षणानंतर आणि वारंवार केलेल्या प्रयत्नांनंतर, अखेर हे विमान बंगळुरूला वळवण्यात आले. सायंकाळी ७:३० च्या सुमारास बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

























































