
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. तमिळनाडूतील कोळाचेल येथे झालेल्या सभेत बोलताना त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख करत “एकेकाळी शांत असलेले राज्य पेटवले गेले असून शेकडो लोकांचा बळी गेला आहे. आजही तिथे संघर्ष सुरूच आहे,” असा आरोप केला.
मणिपूरमध्ये अलीकडेच घडलेल्या एका दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे. या हल्ल्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या अवघ्या 5 महिन्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. आंदोलकांनी प्रमुख रस्ते अडवून निषेध व्यक्त केला, तर काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूरांचा वापर करावा लागला.
मणिपूरमधील हिंसाचाराची पार्श्वभूमी 3 मे 2023 पासून सुरू होते. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवरून आंदोलन सुरू झाले आणि त्यानंतर मैतेई आणि कुकी-जो समुदायांमध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला. या संघर्षात अनेकांचे जीव गेले, हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आणि मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू आणि इतर निर्बंध लागू करण्यात आले होते.
राहुल गांधी यांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भाजपच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “जिथे शक्य आहे तिथे भाजप सत्ता हस्तगत करून राज्ये दिल्लीहून चालवण्याचा प्रयत्न करत आहे. मणिपूरमध्येही त्याचेच परिणाम दिसत आहेत.” त्यांनी तमिळनाडूतील राजकारणावरही भाष्य करत अण्णा द्रमुक पक्षावर टीका केली. “हा पक्ष एकेकाळी राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा होता, पण आज तो भाजपच्या प्रभावाखाली आला आहे. पक्षाचे नेतृत्व भ्रष्टाचारामुळे झुकले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
केंद्राच्या धोरणांवर टीका करत राहुल गांधी म्हणाले, ‘प्रत्येक राज्याची स्वतःची ओळख, परंपरा आणि आवाज असायला हवा. त्या राज्यातील लोकांनीच आपले राज्य चालवणे आवश्यक आहे. मात्र भाजप ‘एक देश, एक भाषा, एक परंपरा’ या भूमिकेतून देशातील विविधता कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तमिळनाडूसारख्या राज्यांवर दिल्लीहून नियंत्रण ठेवण्याची त्यांची भूमिका आहे.
























































