
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याच्या अवघ्या 24 तास आधी राजस्थानातील मोठ्या रिफायनरी प्रकल्पात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीतून आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ही रिफायनरी राजस्थानातील बाळोतरा जिल्ह्यातील पचपद्रा येथे उभारण्यात आलेली आहे. हिंदुस्थानमधील पहिली ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. हा प्रकल्प Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे.
देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यास या रिफायनरीची मोठी मदत होणार आहे.
VIDEO | A fire broke out at the Pachpadra refinery in Rajasthan’s Balotra district, a day before its inauguration by Prime Minister Narendra Modi.
Fire tenders rushed to the spot and efforts were underway to douse the flames. No immediate reports of casualties available. More… pic.twitter.com/eT2xD4vsB4
— Press Trust of India (@PTI_News) April 20, 2026
या प्रकल्पाची पायाभरणी 22 सप्टेंबर 2013 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यकाळात सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्या वेळी प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 37,230 कोटी रुपये होता. सत्तांतरानंतर 16 जानेवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प पुन्हा सुरू केला आणि खर्च वाढवून तो सुमारे 43,129 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला.
इंधन उत्पादनाबरोबरच या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पेट्रोकेमिकल उत्पादनेही निर्माण होणार आहेत. पॉलीप्रॉपिलीन, पॉलीएथिलीन (HDPE/LLDPE), बेंझिन, टोल्युएन आणि ब्यूटाडायीन यांसारख्या उत्पादनांवर आधारित उद्योग उभारण्याची संधी या प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे.
या प्रकल्पामुळे राजस्थान देशातील तसेच जागतिक पातळीवर मूल्यवर्धित उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र उद्घाटनाच्या आधीच लागलेल्या आगीमुळे प्रकल्पाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेची चौकशी होण्याची शक्यता आहे.

























































