
जपान शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. उत्तर जपानमधील सॅनरिकू किनारपट्टीवर 7.5 रिश्टर स्केलच्या महाभयंकर भूकंपाने जोरदार धक्के बसले आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात त्सुनामीचा हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास आलेल्या या भूकंपाने टोकियोपर्यंतच्या उत्तुंग इमारती पत्त्यासारख्या हलू लागल्या. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
जपानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागराच्या तळाशी 10 किलोमीटर खोलीवर होता. या शक्तिशाली भूकंपानंतर समुद्रात 10 फूट उंचीच्या महाकाय लाटा उसळण्याची दाट शक्यता आहे.
‘एनएचके’ या सरकारी वाहिनीने नागरिकांना तातडीने किनारपट्टी सोडून उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. त्सुनामीच्या लाटा वारंवार धडकू शकतात, त्यामुळे इशारा मागे घेईपर्यंत सुरक्षित जागा सोडू नका, अशी सक्त ताकीदही प्रशासनाने नागरिकांना दिली आहे.
दरम्यान, दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू शेकडो किलोमीटर दूर असूनही जपानची राजधानी टोकियोमधील मोठ्या इमारतींना जोरदार हादरे बसले. पंतप्रधान कार्यालयाने या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तातडीने क्रायसिस मॅनेजमेंट टीम स्थापन केली असून बचावकार्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. त्सुनामीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जपानमध्ये सतत भूकंप का होतात?
जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या पश्चिम टोकावर चार मुख्य टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेला आहे. सुमारे 12.5 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात दरवर्षी सरासरी 1500 भूकंपाचे धक्के जाणवतात. जगातील एकूण भूकंपांपैकी 18 टक्के भूकंप एकट्या जपानमध्ये होतात. जगातील एकूण भूकंपांपैकी 18 टक्के भूकंप एकट्या जपानमध्ये होतात. त्यामुळे हा देश सतत निसर्गाच्या टाचेखाली असतो. 2011 मध्ये जपानमध्ये 9.0 रिश्टर स्केलचा प्रलयंकारी भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे 18500 लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले होते. फुकुशिमा अणू ऊर्जा प्रकल्पाचेही यावेळी मोठे नुकसान झाले होते.

























































