
>> नीलेश कुलकर्णी , [email protected]
तामीळनाडूमध्ये दोनपैकी एका द्रमुक पक्षाला बहुमताने आलटून पालटून सत्तेत बसविण्याची परंपरा आहे. यावेळी काय होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल, मात्र यंदा ही परंपरा खंडित होते का, अशी शंका लोकप्रिय दक्षिणी अभिनेते विजय यांच्या ‘क्रेझ’मुळे व्यक्त होत आहे. कोणताही द्रमुक जिंकला तरी सत्तेच्या चाव्या विजय यांच्याकडे असतील, अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
तामीळनाडू विधानसभेचे रण कोणता द्रमुक जिंकणार यावर सध्या पैजा लागलेल्या आहेत. अर्थात कोणताही द्रमुक जिंकला तरी सत्तेच्या चाव्या टीव्हीके प्रमुख अभिनेते विजय यांच्या हाती असण्याची शक्यता दिसत आहे. द्रमुककडे एम. के. स्टॅलिन यांच्यासारखे त्रिभाषा धोरणाला कडाडून विरोध करून प्रादेशिक अस्मिता जोपासणारे नेतृत्व आहे. त्यातच अण्णा द्रमुकमधून जयललितांचे कट्टर समर्थक असणारे माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम हे द्रमुकमध्ये दाखल झाले आहेत. अण्णा द्रमुकचे नेतृत्व पलानीस्वामी करत आहेत. मात्र पलानीस्वामींच्या तुलनेत जनतेचा काwल स्टॅलिन यांच्या बाजूने दिसतो आहे. तामीळनाडूत स्टॅलिन यांनी राबविलेल्या विविध योजना त्यांच्यासाठी अनुकूल बाब आहे. मात्र त्याचबरोबर दीपथूनसारखे वाद स्टॅलिन यांनी ओढवून घेतल्यामुळे हिंदूंमधील श्रद्धावान मतदार त्यांच्यापासून दूर जाण्याची चिन्हे आहेत. शिवाय तामीळनाडूच्या राजकारणात अल्पसंख्याक मतांनाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे ही मते खेचण्यासाठी दोन्ही द्रमुक प्रयत्न करत आहेत. तथापि, अल्पसंख्याकांचा कल हा ख्रिश्चन असलेल्या विजय यांच्याकडे स्पष्टपणे दिसतो आहे. त्यामुळे गेल्या वेळी द्रमुकची पाठराखण केलेला अल्पसंख्याक मतदार अभिनेते विजय यांनी आपल्याकडे वळवला तर तामीळनाडूच्या ‘विजयाचा क्लायमॅक्स’ त्यांच्याकडून होईल, हे निश्चित.
तामीळनाडूच्या राजकारणात काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना तसे स्थान नाही. त्यामुळे खरी लढत दोन द्रमुक व विजय यांचा टीव्हीके यांच्यात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक आघाडी 45.4 टक्के मते मिळवून सत्तेवर आली होती, तर अण्णा द्रमुक आघाडीला 39.7 टक्के मते मिळाली होती. तामीळनाडूत अल्पसंख्याक मतांमध्ये जवळपास प्रत्येकी सहा टक्के मुस्लिम व ख्रिश्चन मते आहेत. गेल्या वेळी ही व्होटबँक द्रमुककडे गेली होती. द्रमुक व अण्णा द्रमुकमधील मतांच्या टक्केवारीत नेमका इतकाच फरक होता. या वेळी संपूर्ण तामीळनाडूमध्ये अल्पसंख्याक समाजात अभिनेता विजयची जबरदस्त व्रेझ आहे. द्रमुककडचा अल्पसंख्याक मताचा गठ्ठा विजय यांनी पळवला तर द्रमुकची सत्तेची वाट बिकट होणार आहे. जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक हा पक्ष खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे. पलानीस्वामींच्या नेतृत्वाला कमालीच्या मर्यादा आहेत. पलानीस्वामींच्या तुलनेत स्टॅलिन बरे, ही जनभावना आहे. मात्र विजय यांनी स्टॅलिन यांच्या मतपेढीला सुरुंग लावला तर द्रमुकला सत्तेवर उदक सोडावे लागेल. विजय यांचा पडद्यावरील जलवा निवडणुकीतही चालला तर तामीळनाडूचे सत्तेचे गणित बदलू शकते. चित्रपटाच्या पडद्यावर ‘हिरो’ असणारे विजय हे निकालानंतर तामीळनाडूचे हिरो बनतात की रजनीकांत व कमल हसन या इतर लोकप्रिय अभिनेत्यांप्रमाणे ‘झिरो’ बनून त्यांच्या हाती भ्रमाचा भोपळा येतो, हे यथावकाश कळेलच.
रेकॉर्डब्रेक मतदान
केरळम, आसाम या दोन राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या तिन्ही राज्यांत विक्रमी मतदान झाले हे या निवडणुकीचे वैशिष्टय़. आसाममध्ये सुमारे 85 टक्के, केरळममध्ये 79 टक्के, तर पुद्दुचेरीमध्ये तब्बल 90 टक्के इतके प्रचंड मतदान झाले. साधारणपणे मतदानाची टक्केवारी वाढली की, तो सत्तापक्षाच्या विरोधातला कौल मानला जातो. मात्र तिन्ही राज्यांत तशी स्थिती नाही हे विशेष. आसाम व केरळममध्ये निवडणूक जिंकण्याची नामी संधी काँगेसकडे होती. मात्र काँग्रेस ग्राऊंडवर कमी पडल्याचे दिसून येत आहे. हिमंता बिस्वा सरमा, विजयन व रंगास्वामी हे त्या त्या राज्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना टक्कर देईल असा नेता त्या त्या राज्यांत विरोधी पक्षांकडे नव्हता हे मान्य करावे लागेल. त्यामुळे वाढलेले व्होटिंग टर्नआऊट हे सत्तारूढ पक्षाच्या बाजून झुकले तर हे तिन्ही विद्यमान मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसतील, यात शंका नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून अत्यंत लक्षणीय अशी सकारात्मक बाब घडली ती अशी की, एरवी निवडणूक प्रक्रियेबद्दल कमालीची अनास्था बाळगणारा वर्ग आता सजग होतो आहे. मतदान करतो आहे. निवडणुकीत कोणी जिंकेल कोणी हरेल. मात्र रेकॉर्डब्रेक मतदानाच्या निमित्ताने आपली लोकशाही अधिक मजबूत होते आहे हे एक सुलक्षणच!
विजयन हॅटट्रीक करणार का?
केरळमचे सलग दहा वर्षांपासून मुख्यमंत्री असणारे कॉम्रेड विजयन केरळममध्ये विजयाची हॅट्ट्रिक करणार काय? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. केरळममध्ये 1977 नंतर पहिल्यांदाच मतांची टक्केवारी वाढली. केरळम हे पहिले साक्षर राज्य. डावे व काँगेस यांना मल्याळी जनता आलटून पालटून विजयाची संधी देत असते. मात्र गेल्या दहा वर्षांत केरळममध्ये काँग्रेस पक्ष कमालीचा विखुरला गेला आहे. विशेषतः ए. के. अँटनींसारखे नेते सक्रिय राजकारणातून बाजूला पडल्यानंतर केरळम काँग्रेसला गटबाजीने घेरलेले आहे. राहुल गांधींचे खासम्खास के.सी. वेणुगोपाल यांच्यासह अर्धा डझन काँग्रेसी या वेळी मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसले होते, त्यात शशी थरूरही आले. तसेच इराण-इस्रायल युद्धाचाही अप्रत्यक्ष परिणाम केरळममध्ये पाहायला मिळाला. केरळममचे सुमारे 35 लाख लोक खाडी देशांमध्ये उपजीविकेसाठी राहतात. विजयन यांच्या सरकारने कोरोना काळात चांगले काम केले. त्यामुळे कुशल प्रशासक अशी विजयन यांची प्रतिमा आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ या योजनेंतर्गत दिल्लीकरांचेही विजयन यांच्या विजयी वारूला ‘खुराक’रूपी समर्थन आहे. विजयन यांची एक सक्षम नेता, अशी प्रतिमा बनली आहे. त्याचा प्रतिवाद करणारा चेहरा काँग्रेसकडे नाही. वास्तविक गेल्या दहा वर्षांतील अँटी इन्कम्बन्सी असताना काँग्रेसला केरळमच्या भूमीत आपला विजयी झेंडा रोवता आला असता. मात्र तशी परिस्थिती दिसत नाही.


























































