
एलपीजीची सर्वाधिक टंचाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच गुजरातमध्ये असून लोकांचे खायचे वांधे झाले आहेत. त्यामुळे यूपी-बिहारच्या मजुरांनी गावाकडे पलायन सुरू केले आहे. सुरतमधील उधना स्टेशनवर रविवारी गाडी पकडण्यासाठी हजारो मजुरांची तोबा गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात अनेक मजूर जखमी झाले. विकास मॉडेलचा गाजावाजा करणाऱया गुजरातची ‘खरी सुरत’ यानिमित्ताने समोर आल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
उत्पादनासाठी एलपीजीवर अवलंबून अनेक कंपन्यांना टाळे लागले आहे. त्यामुळे मजूर गावाकडे निघाले असून सुरतमधील उधना स्थानकावर आज चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी लाठीमार केल्याने तणाव वाढला. लोक सैरावैरा पळू लागले. काहींनी जाळीवरून उडय़ा मारल्या.
पुन्हा येथे कधीच येणार नाही!
सुरत सोडून गावाकडे यूपी-बिहारला जाणाऱया मजुरांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. रोजगाराअभावी हे सगळे लोक हतबल झाल्याचे दिसत आहे. पुन्हा येणार नाही. कधीच येणार नाही, अशी व्यथा त्यांनी गुजरात सोडताना व्यक्त केली.
तीन लाख कामगारांचे पलायन
सुरत हे देशातील वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र आहे. गॅस तुटवडय़ामुळे वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला आहे. या उद्योगाला दिवसाला 15 हजार गॅस सिलिंडरची गरज लागते, मात्र सध्या पुरवठा कमी आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. उत्पादन 6.5 कोटी मीटरवरून 4.5 कोटी मीटरवर आले आहे. आतापर्यंत जवळपास तीन लाख कामगारांनी स्थलांतर केले आहे.



























































