
सोशल मीडियावरून व्हायरल केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर व दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरुद्ध निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून बनवण्यात आलेले मेसेज 3 तासांच्या आत डिलिट न करणाऱ्या सोशल मीडियांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.
माहिती-तंत्रज्ञान अधिनियम, 2000, आयटी नियम 2021 आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. एआयचा वापर करून किंवा डिजिटलरीत्या बदललेल्या मजकुरावर एआय जनरेटेड, डिजिटली एन्हान्स्ड किंवा सिन्थेटिक कन्टेंट अशी स्पष्ट नोंद करणे आवश्यक असून त्या मजकुराच्या मूळ स्रोताची माहिती देणेही बंधनकारक असेल.
पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडू, पुद्दुचेरी या राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान आचारसंहिता भंग करणारे, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू शकणारे किंवा मतदान प्रक्रियेविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्ट्सवर संबंधित राज्यांच्या आयटी नोडल अधिकाऱयांमार्फत लक्ष ठेवून तात्काळ कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 11 हजारांहून अधिक पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे.

























































