
महाराष्ट्रावर दुहेरी संकट कोसळणार असल्याची चाहूल हवामानाने दिली आहे. आधीच उन्हाच्या तडाख्याने राज्यातील अनेक जिह्यांना होरपळून काढले असतानाच आता अवकाळीचाही इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडय़ातील काही जिह्यांमध्ये तीन दिवस वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील चार जिह्यांना 22 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातील तीन जिह्यांमध्ये येत्या तीन दिवसांत उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिह्यांमध्ये येत्या दिवसांत मळभ दाटून ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो असा वेधशाळेचा अंदाज आहे. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये वाऱयांचा वेग अधिक असेल असेही सांगण्यात आले आहे. शेतकरी आणि नागरिकांना सतर्प राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
कोकण, मराठवाडय़ावरही शिडकाव्याचा अंदाज
कोकणात पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मराठवाडयातही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असून बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
अवकाळीचे कारण
प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे ‘अल निनो’ची स्थिती निर्माण होते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन तापमानात मोठी वाढ होते. याउलट समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी झाल्यास ‘अल निनो’चा प्रभाव दिसून येतो. यामुळे कडाक्याची थंडी आणि अधिक पावसाची स्थिती निर्माण होत असते.
विदर्भाचा पारा आणखी वाढणार
विदर्भात उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस इतके राहू शकते. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे आणि उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे असा सल्ला देण्यात आला आहे.

























































